करमाळ्याच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या पुनर्बांधणी कामाचे भूमिपूजन संपन्न
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या पुरातत्त्व व संग्रहालय विभागाअंतर्गत करमाळ्यातील ऐतिहासिक किल्ल्याचे संवर्धन व जतन करण्यात येणार असून या कामासाठी २ कोटी निधी मंजूर झाला आहे. या भुईकोट किल्ल्याच्या पुनर्बांधणीच्या कामाचे काल (दि.१२) भूमिपूजन पुरातत्व खात्यातील अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी किल्ला विभागात राहणारे नागरिक तसेच या किल्ल्यासाठी विविध स्वच्छता मोहीम आखणारे ‘दुर्गसेवक करमाळकर’ या ग्रुपचे सदस्य यावेळी उपस्थित होते. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ नारळ फोडून व दरवाज्याला हार लावून या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. २-३ दिवसात या कामाचा शुभारंभ होणार असल्याचे सांगण्यात आले.
इ.स.१७३० च्या सुमारास राजे रावरंभा निंबाळकर यांच्या काळात हा किल्ला बांधण्यात आला होता. सध्या किल्ल्याची अनेक ठिकाणी पडझड झालेली आहे. या कामासाठी निधी उपलब्ध झाल्यामुळे मुख्य दरवाजा, किल्ल्याचे बुरुज दुरुस्ती, तटबंदीचे काम, किल्ल्याबाहेरील परिसर सुशोभीकरण करणे या किल्ल्याच्या कामासाठी निधी मंजुरी झाला असून या कामाचे काल भूमिपूजन करण्यात आले. या कामामुळे किल्ल्यास पुर्नवैभव लाभणार असून करमाळा शहराच्या विकासात आणखीन भर पडण्यास मदत होणार आहे.