गणेश चिवटे यांच्या हस्ते मिरगव्हाण व खडकेवाडी येथे रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन

करमाळा – करमाळा तालुक्यातील मिरगव्हाण व खडकेवाडी येथे शेतकरी व ग्रामस्थांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या समस्यांना या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतुकीसाठी तसेच दैनंदिन दळणवळणासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर गणेश चिवटे यांनी सातत्याने पाठपुरावा करून विविध विकासकामे मंजूर करून आणली असून, त्याचे उद्घाटन व भूमिपूजन सध्या तालुक्यातील विविध गावांमध्ये होत असल्याचे चित्र आहे,


भूमिपूजनप्रसंगी बोलताना गणेश चिवटे म्हणाले, “वीट जिल्हा परिषद गटातील अनेक गावांमध्ये रस्त्यांची कामे मंजूर करून आणली आहेत. येणाऱ्या काळात राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून तसेच पालकमंत्री नामदार जयकुमारजी गोरे आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सहकार्याने या गटातील प्रत्येक गाव, वाडी-वस्तीवरील रस्त्यांच्या समस्या तसेच इतर मूलभूत अडचणी कायमस्वरूपी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल.”

या रस्त्यांच्या कामांमुळे शेतकऱ्यांचा शेतीमाल बाजारपेठेत नेणे सुलभ होणार असून विद्यार्थ्यांना, महिला व ग्रामस्थांना दैनंदिन प्रवासात मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून, आगामी काळात विट जिल्हा परिषद गट गणेश चिवटे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अफसर तात्या जाधव, नूतन नगरसेवक रामभाऊ ढाणे, भाजप तालुका अध्यक्ष काकासाहेब सरडे, गणेश महाडिक यांच्यासह मिरगव्हाण व खडकेवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

