करमाळा बायपास रोडवर दुचाकीस्वार व कुत्र्याचा अपघाती मृत्यू

करमाळा, ता. २६ : करमाळा शहरातील बायपास रोडवर सोमवारी (दि. २६) दुपारी सुमारे चारच्या सुमारास दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या तरुणाचा भीषण अपघात झाला आहे. स्थानिकांकडून समजलेल्या माहितीनुसार सदर व्यक्तीचा गाडीवरून तोल जाऊन तो रस्त्यावर पडला. त्याचवेळी मागून येणारे वाहन त्याच्या अंगावरून गेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी त्या व्यक्तीच्यासोबत गळ्यात साखळी असलेला एक कुत्राही होता. या अपघातात कुत्र्याचाही मृत्यू झाला आहे.

अशोक नवनाथ नरवडे असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून, तो बीड जिल्ह्यातील रहिवासी असल्याची समजले आहे. या घटनेची नोंद करमाळा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. अपघातानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान, करमाळा बायपास रोडवर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

साईट पट्टी नसल्याने करमाळा बायपास रोडवर अपघातास आमंत्रण
करमाळा बायपास रोडवर दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. मात्र हा रस्ता अरुंद असून त्यावरील साईडपट्टीची अवस्था अत्यंत खराब आहे. साईडपट्टीवर मोठमोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी रस्ता कडेला पूर्णपणे कट झालेला आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत वाहन बाजूला घेण्यासाठी कोणतीही सुरक्षित जागा उपलब्ध नाही. यामुळे येथे मोठ्या अपघाताचा धोका कायम आहे.

साईडपट्टी नसल्याने दुचाकीस्वारांना मुख्य रस्त्यावरूनच प्रवास करावा लागत आहे. रस्ता दुहेरी असला तरी अरुंद असल्यामुळे ओव्हरटेक करणे अत्यंत अवघड झाले आहे. परिणामी वाहनचालकांना मोठ्या जिकिरीने वाहने चालवावी लागत असून दुचाकीस्वार अक्षरशः जीव मुठीत धरून या मार्गावरून प्रवास करत आहेत.
त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याच्या साईडपट्टीचे काम करून खड्डे बुजवावेत, तसेच जातेगाव–टेंभुर्णी रस्त्याचे कामही त्वरित सुरू करून अपघातांमध्ये होणारे जीवितहानी थांबवावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.



