निष्ठावंतांना उमेदवारी द्या!- भाजप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली फडणवीस यांची भेट
करमाळा (दि.२३) – विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास काल मंगळवारपासून सुरवात झाली आहे. असे असले तरी करमाळा-माढा मतदारसंघांमध्ये महायुती कडून उमेदवार कोण उभा राहणार हे अजून ठरलेले नाही. महायुतीकडून उमेदवारी घेण्यासाठी करमाळा तालुक्यातील शिवसेना आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.
वास्तविक करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांना उमेदवारी मिळाली असती परंतु त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे शिवसेना अथवा भाजप यामधून महायुती उमेदवारी देणार आहे.
एकीकडे, “करमाळा मतदार संघ गेल्या २५ वर्षापासून शिवसेना धनुष्यबाणावर लढवत असून यंदाही हा मतदार संघ शिवसेनेलाच लढविण्यास मिळावा” असा दावा शिवसेनेकडून करण्यात येत आहे.
तर दुसरीकडे “करमाळा विधानसभा मतदारसंघ महायुतीने भाजपला सोडण्यात यावा व निष्ठावंत भाजप कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात यावी” अशी मागणी करमाळा तालुक्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी थेट मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
शिवसेनेकडून अद्याप जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचे एकमेव नाव उमेदवारीसाठी पुढे आहे. परंतु भाजपमध्ये अंतर्गत गट पडले असून त्यांच्यामध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा सुरु आहे.
बागल गटाने देखील उमेदवारी साठी भाजप वरिष्ठांकडे फिल्डिंग लावलेली आहे. भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मी बागल यांनी मकाईचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल हे करमाळा विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. भाजपला जागा सुटल्यास दिग्विजय बागल हे भाजपकडून उमेदवार असू शकतात.
दरम्यान भाजपचे गणेश चिवटे यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे, रावसाहेब दानवे, आमदार श्रीकांत भारतीय, भाजपा संघटन मंत्री रवी अनासपुरे, खासदार मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली. करमाळा विधानसभा मतदारसंघ भाजपला सोडण्यात यावा व निष्ठावंत भाजप कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी केली. यावेळी तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, विधानसभा संयोजक काकासाहेब सरडे, जिल्हा चिटणीस विनोद महानवर, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष नानासाहेब अनारसे, गणेश महाडिक आदीजन उपस्थित होते.
याचबरोबर भाजपच्या करमाळ्यातील दुसऱ्या शिष्टमंडळाने देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची मुंबई येथे भेट घेतली. यामध्ये गणेश कराड, दीपक चव्हाण, जितेश कटारिया, सरपंच अंकुश शिंदे, संजय घोरपडे, किरण बोकन, नरेंद्रसिंह ठाकुर, मनोज कुलकर्णी, संतोष कांबळे आदी जणांनी भेट घेऊन करमाळा विधानसभेला भारतीय जनता पार्टीला जागा सोडण्यात यावी व भाजप च्या निष्ठावान आणि विश्वासू कार्यकर्त्याला संधी मिळावी अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान फडणवीस यांनी निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले आहे.
शिवसेनेच्या शिष्टमंडळाने देखील उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. पक्षीय राजकारणाचा वापर करून नंतर स्वतःचा राजकीय गट निर्माण करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी शिवसेना भाजपचे निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी द्या व तालुक्यात शिवसेना भाजप युतीची ताकद मजबूत करा अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केली.बागल गटाला उमेदवारी दिली तर आम्ही प्रचार करणार नाही असा इशारा महेश चिवटे यांनी आधीच दिला आहे. बागल सोडून शिवसेना-भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी व या उमेदवारीला भाजप शिवसेनेत काम करणाऱ्या सर्व पदाधिकारी व भाजपचा लाभ घेतलेल्या सर्व गटांनी पाठिंबा द्यावा तशा सूचना आपण संबंधितांना द्यावेत अशी मागणी चिवटे यांनी केली.
महायुतीच्या उमेदवारीसाठी तालुक्यातील शिवसेना आणि भाजप पदाधिकाऱ्यांत रस्सीखेच सुरु आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकजण इच्छुक असतानाच मंगळवारी भाजपा प्रज्ञासेलचे जिल्हाध्यक्ष सुहास घोलप यांनीही या स्पर्धेत उडी घेतली असून पंधरा वर्षांपासून निष्ठेने केलेल्या कामाची दखल घेऊन भाजपाने उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. मंगळवारी दुपारी चार वाजता कानाड गल्ली येथील कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन घोलप यांनी आपली दावेदारी स्पष्ट केली आहे.
महेश चिवटे याविषयी माहिती देताना म्हणाले की, वर्षानुवर्ष शिवसेना-भाजप विधानसभेसाठी युती बाहेरचा उमेदवार आयात करतो त्याला कार्यकर्ते निवडून देतात मात्र नंतर हे नेते मंडळी स्वतःचा गट तयार करतात व नंतर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या राजकारणात सेना-भाजपच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडतात. लोकसभा निवडणुकीत बागल गट बरोबर असताना सुद्धा तालुक्यात 52 हजाराची पिछाडी महायुतीच्या उमेदवाराला सहन करावी लागली याचेही परीक्षण भाजपचे नेते मंडळींनी करावे.
भाजपचे गणेश चिवटे याविषयी माहिती देताना म्हणाले की, गेले वीस ते पंचवीस वर्षापासून आम्ही भाजपचे तळमळीने काम करत आलेलो आहे. तळागाळामध्ये पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे भाजपकडून उमेदवारी देताना फक्त निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच उमेदवारी दिली पाहिजे अचानक पक्षामध्ये बाहेरून आलेल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली तर आमच्यावर अन्याय होणार आहे. फडणवीस यांनी आमच्यावर अन्याय होणार नाही असे आश्वासन दिले.
पत्रकार परिषदेत सुहास घोलप म्हणाले की, गेल्या पंधरा वर्षांपासून संघ कार्य, भाजपा प्रज्ञा सेल, वंदे मातरम शक्ती सेना, पत्रकार संघटना, सनिश्री चॅरिटेबल ट्रस्ट, आरटीआय मानवाधिकार संघटना आदींच्या माध्यमातून समाजसेवेसह पक्षकार्यही निष्ठेने केले आहे. त्यामुळे तालुक्यातील मोठा जनसंपर्क पाहता करमाळा विधानसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे घोलप यांनी म्हटले आहे.