मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळ्यात २२ जुलैला रक्तदान शिबीर

करमाळा (दि.२०): महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर भारतीय जनता पार्टीतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमाचा भाग म्हणून भाजपा करमाळा शहर मंडळाच्या वतीने दिनांक २२ जुलै रोजी गायकवाड चौकातील भाजपा संपर्क कार्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, नियोजनाबाबत माहिती देताना भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी सांगितले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की, माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाहिरातबाजी न करता समाजोपयोगी उपक्रम राबवावेत. हीच माझ्यासाठी खरी शुभेच्छा असेल.”

या प्रेरणेतून देवेंद्र फडणवीस यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त करमाळा येथे किमान ५५५ व जास्तीत जास्त १००० हून अधिक रक्त पिशव्या संकलनाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपत राबवण्यात येणार आहे.

भाजपा करमाळा शहर मंडळाचे अध्यक्ष काकासाहेब सरडे यांनी सांगितले की, “या शिबिराच्या यशस्वीतेसाठी सर्व आवश्यक नियोजन पूर्ण झाले असून, जिल्ह्यात सर्वाधिक रक्त संकलन करण्याचा आमचा दृढ संकल्प आहे.”



