संत निरंकारी मंडळाच्या शिबीरात २६० जणांचे रक्तदान

करमाळा(दि.२९): संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन, करमाळा यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल २६० जणांनी रक्तदान केले. करमाळा येथे मानव एकता दिन निमित्त हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी संत निरंकारी मंडळाचे सोलापूर झोनचे ज्ञानप्रचारक चाँदभाई तांबोळी महाराज, करमाळा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, मकाई साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अशपाक जमादार, जिल्हा परिषद सोलापूरचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी प्रभावती जगताप, सरपंच रविंद्र वळेकर, तसेच पत्रकार जयंत दळवी, अंगद देवकते, बाळासाहेब भिसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात चाँदभाई तांबोळी महाराज यांनी संत निरंकारी मंडळाच्या आध्यात्मिक व सामाजिक मानवतावादी कार्याची माहिती दिली. शिबिरातील रक्तसंकलनाचे काम बार्शी येथील रामभाई शहा रक्तपेढी, सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल, आणि श्रीमती गोपाबाई दमाणी ब्लड बँक यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले.

अनेक मान्यवरांनी स्वतः रक्तदानात सहभागी होऊन मंडळाच्या निष्काम सेवेचे कौतुक केले. रक्तदात्यांचा सन्मान पुस्तक व रोप भेट देऊन करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेवादल अधिकारी रमेश वारे, भैरू वळेकर, वैशाली सरडे, मुकुंद साळूंके, अंगद पडवळे, बप्पा धडस, एकनाथ निमगीरे, मोहन चोरमले, मनधीर शिंदे, सुनील भोगे यांच्यासह अनेक महिला-पुरुष सेवादल सदस्यांनी मेहनत घेतली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील शिंदे यांनी केले. सर्व रक्तदात्यांचे, मान्यवरांचे व रक्तपेढीच्या डॉक्टरांचे आभार करमाळा शाखेचे ब्रँच मुखी पोपट थोरात यांनी मानले.

