रक्तदात्यांना अल्प दरात अष्टविनायक दर्शनयात्रा – केम येथे अनोखा उपक्रम

केम (संजय जाधव) : रक्तदान हे श्रेष्ठ दान समजले जाते. मोठ्या सर्जरींमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे पेशंटचे प्राण वाचण्यास मदत होते. यामुळे अनेक सामाजिक संघटना रक्तदान शिबिरे आयोजित करत असतात. जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे यासाठी रक्तदात्यांना विविध उपयोगी वस्तू भेट देऊन आकर्षीत केले जातात. काही ठिकाणी पेट्रोल देखील मोफत दिले जाते. अशाच प्रकारे केम येथे जास्तीत जास्त नागरिकांना रक्तदान करण्यास आकर्षित करण्यासाठी रक्तदात्यांना अल्पदरात ३ दिवसीय अष्टविनायक दर्शनयात्रा करवून देण्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हे रक्तदान शिबीर श्री उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्ट व उत्तरेश्वर रक्तदाते संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार दि २७ रोजी आयोजित केले असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष भैरू शिंदे यांनी दिली.
हे शिबीर उत्तरेश्वर मंदिरातील हाॅल मध्ये सकाळी ९ ते १ पर्यत राहणार आहे. संघटनेचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या निमित्त रक्तदात्यांना अल्प दरात तीन दिवस अष्टविनायक दर्शन यात्रा घडविणार आहोत तरी रक्तदात्यानी जास्ती जास्त संख्येने रक्तदान करून या यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहान संघटनेचे सचिव दत्ता कुलकर्णी यांनी केले आहे. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी रक्तदाते संघटनेचे सदस्य परिश्रम घेत आहे या सामजिक उपक्रमाचे केम व परिसरातून कौतूक होत आहे.





