कंदर येथील बाजारतळावरून बोलेरो पिकअपची चोरी

करमाळा ता.20: भोगेवाडी (ता. माढा) येथील आणि सध्या कंदर येथे वास्तव्यास असलेल्या रवींद्र अर्जुन पठाडे यांचा पांढऱ्या रंगाचा बोलेरो पिकअप वाहनाची 8 ऑक्टोबर च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बाजारतळावरून चोरी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवींद्र पठाडे (वय 35) हे शेती व केळी-भाजीपाला वाहतुकीचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे एमएच-45-6195 असा नंबर असलेला पांढरा महिंद्रा बोलेरो पिकअप असून तो त्यांचा लहान भाऊ राजेंद्र पठाडे चालवतो.

दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 10 वाजता, भावाने पिकअप बारामती येथे खाली करून कंदर येथील बाजारतळावर आणून लॉक करून ठेवला.फिर्यादी स्वतः रात्री 11 वाजता घरी आले तेव्हा गाडी बाजारतळावर होती.पहाटे 1.15 वाजता, दुसऱ्या गाडीवरील ड्रायव्हर व लेबर यांनी फोन करून जेवणासाठी घरी येत असल्याचे सांगितले.ते जेवण करून परत रात्री 2 वाजता निघाले असता बाजारतळावर पिकअप दिसत नसल्याचे बाळासाहेब शिंदे यांनी कळवले.

तत्काळ घरच्यांनी कारने शोधमोहीम राबवत जेऊर, कुंभेज फाटा आणि आसपासचा परिसर पिंजून काढला; मात्र पिकअप सापडला नाही.
या घटनेनंतर पठाडे यांनी खात्रीपूर्वक पोलिसात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करमाळा पोलिसांकडून या चोरीचा तपास सुरू आहे. वाहनाबाबत माहिती असल्यास संबंधितांनी तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



