निकृष्ट तलावकामावरून प्रहार जनशक्तीचे पुण्यात ‘बोंबाबोंब’ आंदोलन

केम(संजय जाधव):सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केम, पोथरे, जातेगाव आणि इतर अनेक गावांमध्ये शिवनेरी कंट्रक्शन संस्थेने केलेल्या साठवण पाझर तलावाच्या निकृष्ट कामाच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाने आज, बुधवार दि. १६ डिसेंबर २०२५ रोजी, मुख्य अभियंता मृद व जलसंधारण विभाग, येरवडा, पुणे येथील मुख्य अभियंता कार्यालयासमोर ‘बोंबाबोंब’ आंदोलन केले.

यावेळी प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र घोषणाबाजी करत शिवनेरी कंट्रक्शनचे कंत्राटदार शिवाजी उत्तरेश्वर तळेकर यांनी शासनाची फसवणूक केल्याचा आरोप केला. या आंदोलनाद्वारे प्रहार जनशक्ती पक्षाने प्रामुख्याने दोन महत्त्वाच्या मागण्या उचलून धरल्या:
फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी: शासनाची फसवणूक केल्याबद्दल कंत्राटदार शिवाजी उत्तरेश्वर तळेकर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.
संस्थेला ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये टाकण्याची मागणी: शिवनेरी कंट्रक्शन संस्थेला आठ दिवसांच्या आत ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये टाकण्यात यावे.


मुख्य अभियंत्यांकडून लेखी आश्वासन
प्रहार संघटना व आंदोलक शेतकऱ्यांच्या या तीव्र मागणीची दखल घेत, मुख्य अभियंता (मृद व जलसंधारण विभाग, येरवडा, पुणे) श्री. नितीन दुसाने यांनी तात्काळ कारवाईचे आश्वासन दिले. श्री. दुसाने यांनी संबंधित तक्रार वरिष्ठ दक्षता व गुणनियंत्रण पथक, मृद व जलसंधारण विभाग, पुणे यांना लेखी पत्राद्वारे कळवली. तसेच, हे कार्यवाही पत्र आंदोलकांना देण्यात आले.

प्रहार संघटनेचा इशारा
प्रहार जनशक्ती पक्षाने प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर आठ दिवसांत शिवनेरी कंट्रक्शन संस्थेला ब्लॅक लिस्टमध्ये टाकले नाही आणि कंत्राटदार शिवाजी तळेकर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू झाली नाही, तर पुढील आंदोलन मंत्रालयामध्ये करण्यात येईल.
यासोबतच, करमाळा तालुक्यातील संबंधित गावांमधील अपूर्ण स्वरूपात राहिलेली कामे त्वरित पूर्ण करण्यासाठी नवीन ठेकेदार नेमून कामे लवकर पूर्ण करण्याचे आदेश देण्याची मागणीही आंदोलकांनी केली आहे.
करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा साठवण पाझर तलावाचा प्रश्न शिवनेरी कन्ट्रक्शन संस्थेला जलसंधार विभाग , जिल्हा परिषद विभाग, कृषी या सर्व विभागातून ब्लॅक लिस्ट करण्यासाठी ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हिवाळी अधिवेशन 14 डिसेंबर 2025 रोजी विधान परिषद मध्ये गांभीर्याने घेतल्याने व शिवनेरी कंट्रक्शन ला ब्लॅक लिस्ट करून कारवाई केल्यास प्रहार संघटना 100 किलो हार घालून पालकमंत्री जयकुमार गोरे जंगी स्वागत करणार असल्याचे प्रहार संघटनेकडून सांगण्यात आले.

आंदोलनाला पाठिंबा
करमाळा तालुक्यातील या साठवण तलावाच्या निकृष्ट कामाच्या विरोधात प्रहार संघटनेने पुकारलेल्या या आंदोलनाला राष्ट्रीय समाज पार्टीने जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी राष्ट्रीय समाज पार्टी पुणे शहराध्यक्ष बालाजी दादा पवार आणि राष्ट्रीय समाज पक्ष पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष गणेश लोंढे यांनी उपस्थित राहून आंदोलनाला सक्रिय समर्थन दिले.
यावेळी प्रहार संघटना सोलापूर शहराध्यक्ष अजित कुलकर्णी, प्रहार करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर, शेतकरी, प्रताप तळेकर, काका चव्हाण, शिवाजी तळेकर सर,बापू गलांडे, मच्छिंद्र कोकाटे, संतोष मोठे चेअरमन, सोनू बिचितकर केदार बिचितकर व इतर केम जातेगाव पोथरे शेतकरी वर्ग प्रहार संघटना कार्यकारी पदाधिकारी, उपस्थित होते.
