बोरगाव रस्त्याचे काम रखडले; प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ग्रामस्थ संतप्त

करमाळा(दि. २३) जनसुविधा योजनेतून गेल्यावर्षी मंजूर झालेल्या येथील बोरगाव (भोगल वस्तीजवळील) रस्त्याचे काम प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गेल्या चार महिन्यांपासून रखडले असून, यामुळे पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात माजी सरपंच श्रीराम भोगल, सुरेश भोगल व भोगल वस्ती ग्रामस्थ यांच्या वतीने उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय करमाळा यांना निवेदन देण्यात आले आहे.

त्यात म्हटले आहे की, संबंधित रस्त्याचे काम मंजूर असून, शेतकऱ्यांनी सहमती बॉन्डही दिलेला आहे. मात्र, एका शेतकऱ्याच्या तक्रारीमुळे आणि मोजणीच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या अडथळ्यामुळे हे काम अर्धवट अवस्थेत थांबले आहे. सदर शेतकऱ्याने २६ मार्च २०२५ रोजी मोजणीची मागणी केली. मात्र, आजपर्यंत संबंधित कार्यालयाने प्रत वा हद्दीच्या खुणा निश्चित केलेल्या नाहीत. यामुळे जवळपास चार महिन्यांचा कालावधी वाया गेला असून, या कालावधीत मंजूर निधीही परत गेल्याची शंका निर्माण झाली आहे.

या कामाच्या अडथळ्याला संबंधित विभागच जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. करमाळा गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना फोन करून “मोजणी न झाल्यास काम सुरू करू नका” असे तोंडी आदेश दिल्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही. सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात हा मार्ग अत्यंत आवश्यक असून, शेतकरी, विद्यार्थी, वयोवृद्ध आणि दुधउत्पादक यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.


या परिस्थितीवर त्वरित उपाय न झाल्यास आम्ही संपूर्ण वस्तीतील नागरीकांसह आपल्या कार्यालयात आंदोलन छेडू, असा इशारा अर्जाद्वारे देण्यात आला आहे. “रस्त्याच्या रखडलेल्या कामासाठी आणि निधी परत जाण्यासाठी आपले कार्यालयच पूर्णतः जबाबदार राहील,” असेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
ग्रामस्थांनी लवकरात लवकर मोजणीच्या खुणा निश्चित करून रस्त्याचे काम सुरू करण्याची जोरदार मागणी केली आहे.



