ऊत्तरेश्वर देवस्थानचा सीसीटीव्ही कॅमेरा तातडीने सुरू करावा – नागरिकांची मागणी

केम(संजय जाधव) – करमाळा तालुक्यातील केम येथील जागृत ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर देवस्थान हे मंदिर स्टेशन रोडवर असून, मंदिर परिसरात बसविण्यात आलेला सीसी कॅमेरा बंद आहे. यामुळे सुरक्षा धोक्यात असल्याने देवस्थान ट्रस्टने हा कॅमेरा तातडीने सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

अलीकडेच गावातील एका व्यक्तीची गाडी चोरीला गेली. संशयित व्यक्ती मंदिरासमोरून गेल्याचे सांगण्यात येते. मात्र कॅमेरा बंद असल्याने त्याचे फुटेज मिळू शकले नाही. जर कॅमेरा सुरू असता तर तपासात पोलिसांना मोठी मदत झाली असती, असे नागरिकांचे मत आहे.

सोमवारी सायंकाळी आरतीच्या वेळी मंदिरात भाविकांची गर्दी असते. अशा वेळी चोरीसारख्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच मंदिराजवळ रेल्वे स्टेशन व मोठे हायस्कूल असल्याने बाहेरील नागरिक व शालेय विद्यार्थ्यांची वर्दळ कायम असते. विशेषतः मुली या रस्त्याने जात असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने सीसी कॅमेरा कार्यरत असणे गरजेचे आहे.

त्यामुळे नागरिकांनी देवस्थान ट्रस्टने तातडीने कॅमेरा सुरू करून भाविक व परिसराच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, अशी मागणी केली आहे.


