शेटे मॅटर्निटी हॉस्पिटल मध्ये जागतिक स्तनपान सप्ताह साजरा
करमाळा – दरवर्षी १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यान ‘जागतिक स्तनपान सप्ताह’ म्हणजेच वर्ल्ड ब्रेस्टफीडिंग वीक साजरा केला जातो. हा विशेष सप्ताह लोकांना स्तनपानाचे फायदे आणि गरजेबद्दल जागरूक करण्यासाठी साजरा केला जातो.
करमाळा येथील शेटे मॅटर्निटी हॉस्पिटल मध्ये जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉ सुनीता दोशी उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात हॉस्पिटल चा संचालिका डॉ प्रीती शेटे यांनी हिरकणी चा गोष्टीचा माध्यमातुन स्तनपानाचे महत्त्व सांगून केले. त्यानंतर शेटे हॉस्पिटल मधे स्तनदा मातांना स्तनपान करणे सुलभ व्हावे यासाठी उभारण्यात आलेल्या “हिरकणी कक्षाचे” प्रमुख पाहुण्यांचा हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यानंतर उपस्थित स्तनदा माता तसेच गरोदर स्त्रियांना डॉ सुनीता दोशी यांनी नियमित स्तनपानाचे आई व बाळाला होणारे फायदे,स्तनपानाच्या पद्धती, स्तनपानात येणाऱ्या अडचणी त्यावरचे उपाय याबाबत सोप्या भाषेत सखोल मार्गदर्शन केले. शेवटी शेटे हॉस्पिटल चे संचालक डॉ विशाल शेटे यांनी आभारप्रदर्शन केले.