केंद्र शासनाच्या HAPIS पथकाकडून करमाळा तालुक्यातील नुकसानीचा घेण्यात आला आढावा -

केंद्र शासनाच्या HAPIS पथकाकडून करमाळा तालुक्यातील नुकसानीचा घेण्यात आला आढावा

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या शेतीच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनाच्या HAPIS (Horticulture Area Production Information System) या संस्थेचे पथक तालुक्यात आले. या पथकात डॉ. नवीनकुमार पाटले (अतिरिक्त आयुक्त, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली), डॉ. रोहित बिष्ट (उप आयुक्त, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली) व हेमंता भार्गव (सहाय्यक संचालक, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली) यांचा समावेश होता.

पथकाने पांडे गावात कृष्णा गोविंद वीर व मेघा सुभाष मोहोळकर यांच्या कांदा पिकाचे तसेच वैशाली अमोल राऊत यांच्या तुर पिकाचे नुकसान प्रत्यक्ष पाहिले. तसेच फिसरे येथील शेतकरी नागेश काटे व इतर शेतकऱ्यांशी चर्चा करून लागवड खर्च, उत्पादन खर्च व झालेल्या हानीबाबत माहिती घेतली.

या पाहणी दौऱ्यात उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र नेटके, मंडल कृषी अधिकारी अमर अडसूळ, उप कृषी अधिकारी प्रवीण दगडे, सहाय्यक कृषी अधिकारी टी. एल. चव्हाण, अतुल शहा व गणेश माने आदी अधिकारी उपस्थित होते. तालुका कृषी अधिकारी श्री. नेटके यांनी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान मांडले तर उपविभागीय कृषी अधिकारी श्री. वाकडे यांनी कांदा, ऊस आणि इतर पिकांच्या नुकसानीची माहिती दिली.

शेतकऱ्यांशी थेट संवाद..
पथकातील मान्यवरांनी शेतकरी बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधला. “शेतकऱ्यांना मोठा तोटा झालेला आहे, याची आम्ही नोंद घेत आहोत. केंद्र शासनाकडे याबाबत सविस्तर अहवाल पाठविण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करू,” असे पथकाने स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!