उत्तरेश्वर मंदिरात चंदन ऊटीचा सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न

केम(संजय जाधव): मृग नक्षत्राच्या आगमनानिमित्त श्री उत्तरेश्वर देवस्थान, केम येथे प्राचीन परंपरेनुसार शिवलिंगावर चंदन ऊटीचा सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडला. यंदा मृग नक्षत्राचे आगमन रविवार, ८ जून २०२५ रोजी सकाळी ७.१७ वाजता झाले असून, यानिमित्त मध्यरात्री १२ वाजता (रविवारी रात्री) पारंपरिक चंदन ऊटी पूजन सोहळा संपन्न झाला.

या विशेष प्रसंगी मंदिरात भजन आयोजित करण्यात आले होते. भक्तांनी रात्री १०.३० पासून सोहळ्याची तयारी सुरू केली होती. मध्यरात्री भक्तांनी विधिपूर्वक स्नान करून ओल्या वस्त्रांनी उपस्थित राहून शिवलिंगावर पाणी अर्पण केले. त्यानंतर कळशी उत्साहात गजरात खाली उतरवण्यात आली. भक्तांनी चंदनाच्या लाकडाने शिवपिंडी घासून तिला दही, दूध आणि पाण्याने स्नान घातले व चंदन पावडरचा लेप दिला.

पुजारी समाधान गुरव यांनी शिवलिंगाची आकर्षक सजावट केली. यानंतर श्री उत्तरेश्वर टोणपे यांनी प्रत्येक भाविकाच्या कपाळावर चंदन ऊटी लावून प्रसाद दिला. शेवटी श्रींची आरती होऊन सोहळ्याची सांगता झाली.


या परंपरेमागील आख्यायिका :
हिंदू संस्कृतीनुसार, ग्रीष्मकालातील उष्णतेपासून भगवान महादेवाच्या शिवलिंगाचे संरक्षण व्हावे म्हणून चैत्र प्रतिपदेपासून (गुढी पाडवा) सुरू होणारी ‘अखंड जलधारा सेवा’ (ताम्रपात्रातून थंड पाण्याची संततधार) मृग नक्षत्राच्या आगमनापर्यंत ठेवली जाते. नंतर, मृग नक्षत्राच्या रात्री १२ वाजता ही जलधारा थांबवली जाते आणि त्याऐवजी शिवलिंगावर शुद्ध व सुगंधित चंदनाचा लेप भक्तिभावाने अर्पण केला जातो. हीच ‘चंदन ऊटी पूजा’ म्हणतात.

या सोहळ्यात उपस्थित मान्यवर :
श्री उत्तरेश्वर देवस्थानचे महंत जयंत गिरी महाराज, कुंभार महाराज, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दादासाहेब गोडसे, सचिव मनोज सोलापूरे, विश्वस्त विजय तळेकर, मोहन दौंड, माजी सरपंच अजित तळेकर, सध्याचे सरपंच राहुल कोरे, पुजारी समाधान गुरव, गणेश गुरव, अवधूत गुरव, दादा नवले, अमोल तळेकर, बबलू पाटील, अमोल गलांडे, सूरज भिस्ते, दत्तात्रय कुलकर्णी, राजेंद्र दौंड, बाळू ननावरे, पंकज तळेकर, उत्तरेश्वर टोणपे, अशोक दादा गुरव, मधूसूदन पाटील, भाजणी मंडळ, ग्रामस्थ तसेच पत्रकार संजय जाधव आदी उपस्थित होते.




