आगामी काळात डिजीटल चिखलठाण करण्याचा मानस : चंद्रकांत सरडे

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : चिखलठाण ग्रामपंचायतीमध्ये आत्तापर्यंत करोडो रूपयाची विकासकामे केली असून, आगामी कालावधीत चिखलठाण गाव डिजीटल चिखलठाण करणार असल्याची माहिती सरपंच चंद्रकांत सरडे यांनी दिली आहे.
चिखलठाण ग्रामपंचायतीमध्ये आमदार संजयमामा शिंदे समर्थक चंद्रकांत सरडे यांचा स्वतंत्र पॅनल असून या पॅनलमधून श्री. सरडे यांच्या पत्नी वनमाला सरडे या सरपंच पदासाठी उभ्या आहेत. त्यानिमित्त आयोजित प्रचार सभेत श्री. सरडे बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, की आमदार संजयमामा शिंदे यांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात ग्रामपंचायतीमध्ये करोडो रूपयाची विकासकामे केली आहेत. गावातील रस्ते, गटारी, पेवींग ब्लॉक, व्यापारी गाळे, मंदिर परिसरात सुविधा, पथदिवे, सौरदिवे, पाणीपुरवठा योजना याबरोबरच वातानुकुलित ग्रामपंचायत कार्यालय आदी सुविधा केल्या आहेत. या निवडणुकीत विरोधकांनी एकत्र येऊन पॅनल उभा केला आहे. ते आम्हाला नवीन नसून ते आमचे पारंपारिक विरोधक आहेत व पुढेही राहणार आहेत. ही निवडणूक विकासकामाच्या जोरावर जनतेनेच हातात घेतली असून, प्रतिष्ठेची नाहीतर एकतर्फी ही निवडणूक झाली आहे.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपेक्षाही या निवडणुकीत आमच्या पॅनलला चांगला प्रतिसाद असून दीड ते दोन हजार मताधिक्याने आमचा पॅनल विजयी होईल; यात शंका नाही. बदलत्या काळानुसार चिखलठाण गावाला ‘डिजीटल चिखलठाण’ करण्याचा मनोदय असून तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक अभ्यासिका व ग्रंथालय करण्यात येणार आहे. तसेच ज्यांना खेळाची आवड आहे, अशा मुलांसाठी व्यायामशाळा, क्रिडांगणाची सुविधा करण्यात येणार आहे. तसेच स्वच्छ व सुंदर गाव बनविण्यासाठी ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी गावात घंटागाडीची सुविधा करण्यात येणार आहे. तसेच ओला व सुका कचरा साठविण्यासाठी चौकाचौकात मोठे डसबीन ठेवण्यात येणार आहे.

ग्रामपंचायतीमार्फत गावात स्पीकरची सुविधा करण्यात येणार असून या स्पीकरवरून सकाळी व संध्याकाळी ग्रामस्थांना टीव्ही व रेडिओवरील बातम्या ऐकविण्यात येणार आहे. तसेच शासनाच्या योजनांची माहिती व काही सूचना द्यावयाच्या या स्पीकरवरून देण्यात येणार आहे. अशाप्रकारचे स्पीकरची सुविधा करणारे चिखलठाण हे एकमेव गाव असेल. चिखलठाण येथील कोटलिंग मंदिराचा ब वर्ग तीर्थक्षेत्रात समावेश करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे, असेही श्री.सरडे यांनी सांगितले.
