बालविवाह प्रकरणी मुलगा व मुलीच्या पालकांविरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा : करमाळा तालुक्यातील गौंडरे गावात अल्पवयीन मुलीचा विवाह झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत बालविवाह प्रतिबंधक अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी बापू दौंडे यांनी अडीच वर्षांनी करमाळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

टेंभुर्णी पोलिस ठाण्यातील एका गुन्ह्याच्या तपासादरम्यान पिडीत मुलीच्या जबाबात ती अल्पवयीन अवस्थेत विवाह झाल्याचे स्पष्टपणे नमूद झाले. त्यानंतर पोलीस प्रशासनाने ही माहिती बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली.
त्यानुसार ग्रामविकास अधिकारी बापू दौंडे यांनी याबाबत माहिती घेतली व करमाळा पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली. त्यात त्यांनी म्हटले आहे की, २ मे २०२३ रोजी दुपारी गौंडरे येथील देवी मंदिरात अल्पवयीन मुलीचा विवाह करण्यात आला. या विवाहास तिच्या कुटुंबीयांसह नातेवाईक उपस्थित होते.
अल्पवयीन मुलीचे आई- वडील चोंभेपिंपरी, (ता. माढा) येथील आहेत तर मुलाचे आई- वडील म्हैसगाव (ता. माढा) येथील आहेत.

यामध्ये पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही विवाह लावून देण्यात आला होता. त्यामुळे मुलीचे व मुलाच्या आई -वडिलां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



