करमाळा तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांसाठी चिवटेंनी दिले पालकमंत्र्यांना निवेदन- बैठकीची केली मागणी
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – सोलापूर पासून करमाळा तालुका 135 किलोमीटर अंतरावर असून या ठिकाणी जिल्हा पातळीवर कोणतेच अधिकारी आढावा बैठक किंवा तक्रारी ऐकून घेण्यासाठी येत नाहीत तालुक्यातील हे प्रश्न सोडवण्यासाठी करमाळा तालुक्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी आढावा बैठक घ्यावी रीटेवाडी उपसा सिंचन योजनेचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नियोजन मंडळाचे सदस्य महेश चिवटे यांनी सभागृहात केली.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी करमाळा तालुक्यामध्ये बैठक घेण्याचे आश्वासन देऊन रिटेवाडी उपसा सिंचन बाबतीत पंधरा दिवसात सविस्तर सखोल माहिती अधिकाऱ्यांकडून घेऊ असे आश्वासन दिले.
कुकडी प्रकल्पासाठी अकराशे कोटी रुपये खर्च करून सर्व तालुक्यात कॅनल खोदण्यात आले आहेत. या कॅनलमध्ये उजनीतून पाणी सोडण्यासाठी रिटेवाडी उपसा सिंचन योजनेसाठी केवळ शंभर कोटी रुपयांची आवश्यकता असून ही योजना पूर्ण झाली तालुक्यातील 50 हजार क्षेत्र ओलीताखाली येऊन दीड लाख नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. याबाबत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. जलसंपदा विभागाने ही योजना सकारात्मक असल्याचा अहवाल दिला आहे. ही बाब महेश चिवटे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. करमाळ्यातील गोरगरिब रूग्णांनसाठी सुरू केलेल्या योजना डॉक्टर अभावी बंद असल्याचे देखील त्यांनी निदर्शनास आणून दिले.
- खालील मागण्यांसाठी चिवटे यांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिले आहे –
- करमाळा शहराची हद्द वाढून शहराबाहेर झालेली विकसित कामे व निवासी घरे नगरपालिके हद्दीत घ्यावी.
- नगरपालिकेतील प्रलंबित 284 घरकुलांना तात्काळ मान्यता द्यावी.
- करमाळा एस टी महामंडळ आगारासाठी नवीन पन्नास बसेस द्याव्या.
- जेऊर येथे स्वतंत्र तालुका पोलीस स्टेशन करावे
- कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी पणन महामंडळाकडून शेतकरी सुविधांसाठी पन्नास लाखाचा निधी द्यावा.
- करमाळा नगरपालिकेसाठी भुयारी गटार योजना मंजूर करावी
- केंद्रीय अमृत जलवाहिनी योजनेतून नवीन पाणीपुरवठा योजना देण्यात यावी तसेच जलशुद्धीकरण केंद्रासाठी तांत्रिक मंजुरीसाठी रखडलेली दीडशे कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी द्यावी.
- शहरातील रंभापुरा येथे छत्रपती संभाजी राजे उद्यानासाठी व स्मारक उभा करण्यासाठी पन्नास लाखाचा निधी द्यावा.
जिल्हा नियोजन मंडळात निवड झाल्यानंतर पहिल्याच बैठकीत शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी तालुक्यातील विविध प्रश्न मांडून सर्व सभागृहाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले.