करमाळ्यात आज मराठा समाजाच्यावतीने भव्य मोर्चाचे आयोजन
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनात झालेल्या हल्ल्याचा निषेध आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आज (ता.६) सकाळी १० वाजता करमाळा शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला अनेक संघटना आणि समाजाने पाठींबा दिलेला आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचाही मोठा बंदोबस्त उभा करण्यात आला आहे. या मोर्चात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठा समाजासाठी आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे यांचे उपोषण सुरु आहे. हे आंदोलन सुरु असताना लाठीचार्ज झाला होता. त्याचा सर्वत्र निषेध केला जात आहे. यातूनच करमाळा येथे शनिवारी निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर रविवारी रस्ता रोको झाला होता. त्यानंतर आज (ता.६) सकाळी १० वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे. हा करमाळा शहरातील पोथरे नाका येथून निघणार आहे. तसेच पुढे मुख्यरस्त्याने छत्रपती चौक येथे हा मोर्चा येणार असून, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून दत्त पेठेतून सुभाष चौक ते राशीन पेठ येथून हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले जाणार आहे, पुढे गायकवाड चौकातून पुढे हा मोर्चा तहसील कार्यालय येथे जाणार आहे. तेथे पंचायत समिती समोरील मैदानात मराठासमाजाच्यावतीने पाच मुली मनोगत व्यक्त करणार आहेत.
तहसील कार्यालय येथे मराठासमाजाच्यावतीने प्रशासनाला निवेदन दिले जाणार आहे. या मोर्चात सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था बाजार समिती व तहसील कार्यालय परिसरात असणार आहे. हा मोर्चा शांततेत व्हावा यासाठी साधारण २० समनव्यक नियोजन करत आहेत. मोर्चेकरांसाठी पोथरे नाका व तहसील कार्यालय परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या मोर्चात करमाळा शहरासह तालुक्यातून अनेक नागरिक सहभागी होणार आहेत. हजारो नागरिक या मोर्चात सहभागी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.