जुन्या पोस्टाजवळील खड्डा त्वरित बुजवावा; नागरिकांची केम ग्रामपंचायतीकडे मागणी

केम(संजय जाधव) : केम ग्रामपंचायतीकडून जलजीवन मिशन योजनेंतर्गत गावात नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक गल्लीत नळाद्वारे सर्वांना पाणीपुरवठा करण्यासाठी वॉल बसविण्याचे काम सुरू असून, या अंतर्गत जुन्या पोस्टाजवळील रहदारीच्या रस्त्यावर खड्डा खोदण्यात आला आहे.

मात्र हा खड्डा खोदून आठ दिवस उलटूनही त्या ठिकाणी अद्याप वॉल बसविण्यात आलेला नाही किंवा खड्डा बुजविण्यात आलेला नाही. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्यास दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ग्रामपंचायतीच्या या दुर्लक्षामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, सदर खड्डा त्वरित बुजवून रस्ता सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामपंचायतीकडे करण्यात येत आहे.


