गणेशनगर भागातील उद्यानाच्या दुरूस्तीची नागरिकांनी केली मागणी

करमाळा : करमाळा शहरातील गणेश नगर मधील छावा प्रतिष्ठानकडून गणेश नगर भागातील उद्यान व इतर प्रलंबित कामांसाठी आमदार संजयमामा शिंदे यांना निवेदन देण्यात आले. संबंधित विभागाला ही कामे तात्काळ करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी शहर अध्यक्ष दत्ता भाऊ फंड,छावा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष वैभव माने, छावा प्रतिष्ठान अध्यक्ष योगेश गुरव व गणेश नगर भागातील नागरिक उपस्थित होते.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बागेमुळे कोणत्याही परिसराला शोभा वाढत असते. लहान मुले, तरुण तसेच नगरातील जेष्ठ नागरीक इ. साठी एक निरोगी आयुष्य स्वच्छ वातावरण निर्मिती व्यायाम तसेच आरामासाठीही उपयुक्त आहे व सध्या संतसेना महाराज मंदिरासमोरील बागेची सर्व स्थिती पाहता ती नादुरुस्त असल्याचे आढळून आले. त्यामुळे ती स्वच्छ करणे. त्यात झाडे लावणे तिथे ओपन जिमची व्यवस्था करणे तसेच बागेच्या कडेने जाळी लावणे हे देखील गरजेचे आहे. गणेशनगर व आसपासच्या परिसरातील जनतेसाठी त्या बागेचा चांगला वापर होऊ शकतो त्यामुळे तातडीने बागेची दूरुस्ती करण्याचे आदेश संबंधित विभागाला द्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली.





