पाणी पुरवठ्याच्या सततच्या बिघाडामुळे मनस्तापासह नागरिकांच्या खिशाला कात्री -

पाणी पुरवठ्याच्या सततच्या बिघाडामुळे मनस्तापासह नागरिकांच्या खिशाला कात्री

0

करमाळा(दि.२५): करमाळा शहरातील नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत सातत्याने बिघाड होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील अनेक भागांत अधूनमधून दोन ते चार दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी बाहेरून जार खरेदी करावी लागत आहे. तर वापरासाठी तब्बल ४०० रुपये टँकरला मोजावे लागत आहेत.

नगरपालिकेकडून पाणीपट्टी तर पूर्ण वसुल केली जाते परंतु पाणी पुरवठा कायम सुरळीत का नाही असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.  स्वखर्चाने पाणी खरेदी करावे लागत असल्याने जनतेत नाराजी आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाचे वातावरण असूनही पाणीटंचाई कायम आहे.

पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक वेळेवर जाहीर न केल्यामुळे महिलांनाही घरगुती कामांमध्ये अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याआधीही नागरिकांनी आंदोलने, निवेदने, हंडा मोर्चा यांसारख्या माध्यमातून आपल्या समस्या मांडल्या आहेत. मात्र समाधानकारक उपाययोजना झालेल्या नाहीत.

दहिगाव पंपिंग स्टेशनवरील तांत्रिक बिघाड, खंडित वीजपुरवठा, पाइपलाईनमधील गळती, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, गढूळ पाणी आणि मौलाली माळ येथील जलशुद्धीकरण यंत्रणेची मर्यादा या सर्व कारणांमुळे शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था कोलमडत आहे. यावर नगरपरिषदेने तातडीने ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

सोमवारपासून आमच्या भागात नगरपालिकेचा पाणीपुरवठा झालेला नसल्याने आम्हाला पिण्यासाठी जारचे पाणी आणावे लागत असून घरगुती वापरासाठी चारशे रुपये खर्च करून पाणी वाहून आणावे लागत आहे. पंपिंग स्टेशन वरील वीजपुरवठा सुरळीत नसला तरी नगरपालिकेने टँकरद्वारे किमान वापरण्यापुरते पाणी पुरवणे गरजेचे आहे.
-अभिजीत पिसे,करमाळा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!