घरासमोर साचलेल्या गटारीतील गाळामुळे नागरिक त्रस्त; शिवाजीनगर भागात अस्वच्छतेचे संकट

करमाळा(दि. 11) – करमाळा शहरातील शिवाजीनगर भागातील नवरत्न कॉलनी येथे तुटलेल्या गटारींमुळे गाळयुक्त पाण्याचा मोठा डोह तयार झाला असून, परिसरातील अस्वच्छतेमुळे रहिवाशांना गंभीर आजारांचा धोका निर्माण झाला आहे.

या डोहात मोकाट वराह व कुत्री डुंबत असून, त्यांच्या अंगावरील घाण घरांच्या भिंतींवर घासली जात आहे. यामुळे दुर्गंधी पसरत असून लहान मुले व वयोवृद्धांना श्वसन, त्वचारोग आणि डासांमुळे होणारे आजार भेडसावत आहेत. काहींना गोचीड तापासारख्या संसर्गजन्य आजारांमुळे उपचार घ्यावे लागले आहेत.

आपल्या घरासमोर व रस्त्यावर अशा परिस्थितीमुळे येथील रहिवाशी त्रस्त झाले आहेत. गटार फक्त ४ इंच रुंदीचे असल्याने सफाई यंत्रणा तेथील गाळ काढण्यात अपयशी ठरत आहे. रस्त्याचेही काम अर्धवट राहिल्याने वाहतूक व पादचारी हालचाल अडथळ्यात आली आहे.

या समस्येबाबत वारंवार तक्रारी करूनही करमाळा नगरपालिकेकडून केवळ पाहणी केली जाते, अशी रहिवाशांची नाराजी आहे. याबाबत नगरपालिकेच्या बांधकाम विभागाचे अभियंता आकाश वाघमारे यांनी सांगितले की, “गटारीच्या कामाबाबत संबंधित ठेकेदाराला सूचना दिल्या असून लवकरच काम पूर्ण केले जाईल.”


