स्वच्छ शाळा, सुंदर शाळा स्पर्धेत गौंडरेची शाळा जिल्ह्यात प्रथम

करमाळा(दि.२०) : स्वच्छ शाळा, सुंदर शाळा स्पर्धा – २०२५ संपूर्ण जिल्हाभर राबविण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातून विविध शाळांनी सहभाग घेत प्रस्ताव दिले होते. यातून जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले आहेत.

जिल्हास्तरीय निकालात विविध उपक्रम राबवित सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक येण्याचा मान करमाळा तालुक्यातील धर्मवीर संभाजी विद्यालय, गौंडरे या शाळेला मिळाला आहे. या निवडीनंतर या शाळेला प्रथम बक्षीस म्हणून दहा हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे.

तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मच्छिंद्र नुस्ते माध्यमिक विद्यालय कविटगाव (ता.करमाळा), द्वितीय क्रमांक महात्मा फुले माध्यमिक विद्यालय मोरवड (ता. करमाळा), तर तृतीय क्रमांक लालबहादूर शास्त्री विद्यालय सालसे (ता. करमाळा) या शाळेच्या निवडी करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रथम क्रमांकास तीन हजार रुपये द्वितीय क्रमांक दोन हजार रुपये तर तृतीय क्रमांकास एक हजार रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.

शाळेत दर्जेदार शिक्षणावर भर देण्याबरोबरच विविध शाळाबाह्य उपक्रम राबविण्यात आले. ज्यामध्ये कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक मुक्त शाळा,स्वच्छतागृह, हँडवॉश, शाळेला रंगरंगोटी, स्वच्छ पाणीपुरवठा, वृक्षारोपण, पक्षी निरीक्षण आदी उपक्रम राबविले.
त्याचबरोबर बेटी बचाओ बेटी पढाव, विधवा महिला सन्मान अशा अभियानांची जनजागृती देखील शाळेत करण्यात आली आहे.
● बापू निळ, मुख्याध्यापक, धर्मवीर संभाजी विद्यालय, गौंडरे ता.करमाळा




