संत निरंकारी मिशनच्या वतीने संगोबा परिसराची व नदीपात्राची स्वच्छता

करमाळा: संत निरंकारी मंडळच्या वतीने संपूर्ण देशभर ‘अमृत प्रकल्पा’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या अभियानाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत नदी व जलस्रोत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
याच मोहिमेचा भाग असलेली संत निरंकारी मंडळ करमाळा शाखेच्या वतीने तालुक्यातील श्रीक्षेत्र संगोबा मंदिराचा अंतर्बाह्य परिसर तसेच सिना नदीचे पात्र स्वच्छ करण्यात आले. महाशिवरात्रीच्या यात्रेदरम्यान येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असल्याने परिसर व नदीपात्रात प्रदूषण वाढते. “प्रदूषण अंदर हो या बाहर, दोनों ही हानिकारक होता है,” या संदेशानुसार बाह्य स्वच्छतेसोबतच अंत:करणाची स्वच्छता राखण्याचाही संदेश देण्यात आला.

देशभरात एकाच वेळी १६०० हून अधिक ठिकाणी नदीपात्रे व लोकोपयोगी तलाव येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सद्गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या सत्प्रेरणेने सन २०२३ पासून ‘अमृत जल प्रकल्प’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. संत निरंकारी मिशन व भारत सरकार यांच्या संयुक्त विचारप्रणालीतून हे देशव्यापी अभियान ‘नरसेवा ही नारायण सेवा’ या उक्तीप्रमाणे श्रद्धेने पार पडत आहे.
संत निरंकारी मिशनच्या वतीने दरवर्षी देशभर वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, नैसर्गिक आपत्तीतील मदतकार्य तसेच विविध स्वच्छता अभियान निष्काम भावनेने राबविले जातात.
या स्वच्छता मोहिमेत करमाळा, जातेगाव, कामोणे, पोटेगाव, पांगरे, नेरले, निंभोरे, शेलगाव, उमरड, वाशिंबे, चिखलठाण, दहिगाव, केतूर, जवळा व केडगाव येथून सुमारे २०० महिला-पुरुष व बालगोपाळ सहभागी झाले.

अभियानाच्या यशस्वीतेसाठी संत निरंकारी मंडळाचे ब्रँचमुखी पोपट थोरात, सेवादल अधिकारी रमेश वारे, भैरू वळेकर, वैशाली सरडे यांच्यासह आत्माराम वायकुळे, डॉ. भाऊसो सरडे, मुकुंद साळुंके, अंगद पडवळे, बप्पा धडस, तानाजी चव्हाण, मोहन चोरमले, योगेश चव्हाण, इन्नूस शेख, राजेंद्र भुजबळ, दादा आव्हाड, शिवाजी हजारे, राजू कारंडे तसेच सर्व महिला व पुरुष सेवादल सदस्यांनी परिश्रम घेतले.


