चिखलठाणच्या यात्रेनंतर अस्वच्छ झालेला परिसर श्रमदानातून स्वच्छ – विद्यार्थ्यांसह, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

करमाळा / संदेश प्रतिनिधी : चिखलठाण (ता. करमाळा) येथील प्रसिद्ध कोटलिंग यात्रेनंतर अस्वच्छ झालेल्या मंदिर परिसराची स्वच्छता जेऊरवाडी येथील योद्धा करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीतून श्रमदानातून केली. बाहेगावच्या लोकांनीही हा उपक्रम पाहून झाडू हाती घेतला आणि यात्रापरिसर स्वच्छ करण्यासाठी पुढे सरसावले. एरव्ही ४० ते ५० हजार रुपये खर्च करून होणारी स्वच्छता श्रमदानातून उभी राहिल्याने अकॅडमीच्या या उपक्रमाने समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.

करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथील कोटलिंग यात्रा ही तालुक्यातील सर्वांत मोठी यात्रा समजली जाते. दरवर्षी या यात्रेस दोन लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती असते. चार दिवस चालणाऱ्या या उत्सवात पाळणे, रसवंतीगृह, हॉटेल्स, खेळणी, खाद्यपदार्थ व शीतपेयांचे स्टॉल्स यामुळे मोठी उलाढाल होते. मात्र, उजनी धरणाच्या काठावर असलेल्या ६०-७० एकराच्या मोकळ्या मैदानात यात्रेनंतर प्लास्टिक बाटल्या, कॅरीबॅग्ज, खराब अन्नपदार्थ आणि कचऱ्याचा ढीग जमा होतो, ज्यामुळे दुर्गंधी पसरते.

यात्रेनंतर परिसराची स्वच्छता करणे ही मोठीच आव्हानात्मक बाब असते. मजुरांमार्फतही पूर्ण स्वच्छता होत नाही. मात्र, शेटफळ येथील सुभेदार मेजर विलास नाईकनवरे व हांबिराव नाईकनवरे यांच्या प्रेरणेने योद्धा करिअर अकॅडमीच्या १२७ विद्यार्थ्यांनी दोन दिवसांनी येथे येऊन स्वच्छता मोहीम राबवली. नवनाथ नाईकनवरे, शिक्षक निलेश कदम, सागर जावरे, अमित पाटील, राहुल कावळे व वैभव नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी श्रमदान सुरू केले. त्यानंतर यात्रा समिती व ग्रामस्थांनीही मोहिमेत सहभाग घेतला. चार ते पाच तासांच्या श्रमदानातून १५ ते २० ट्रेलर कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली आणि संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला.

यात्रा समितीने श्रमदान करणाऱ्या सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था केली होती. भोजनानंतर विद्यार्थ्यांनी उजनी धरणात जलविहाराचा आनंद घेतला. या उपक्रमातून “कोणत्याही यात्रेत किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा करण्यापूर्वी दहा वेळा विचार करू” अशी शिकवण मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
कोटलिंग यात्रा झाल्यानंतर रोजंदारीवर मजूर लावून आम्ही चार पाच दिवस या परिसराची स्वच्छता करून घेत होतो. एरव्ही चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च करून होऊ न शकणारी स्वच्छता योद्धा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी तीन ते चार तासात केली ग्रामस्थांचाही याच्यामध्ये सहभाग होता या उपक्रमाच्या माध्यमातून त्याची खरी सेवा काय असते याचा आदर्शच या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घालून दिला आहे. – चंद्रकांत सरडे (माजी सरपंच चिखलठाण)

कोटलींग यात्रा कालावधीमध्ये दर्शनासाठी ॲकडमीमधील चार पाच विद्यार्थ्यांबरोबर आम्ही कोटलिंग मंदिरावर आलो होतो यावेळी सहज उजनी धरण काठावरील या निसर्ग रम्य परिसरामध्ये या यात्रेमुळे फारच अस्वच्छता होत असल्याचे आम्हाला दिसले यावेळी या ठिकाणच्या स्वच्छतेचा विषय निघाला आल्यानंतर आपण त्या ठिकाणी स्वच्छतेसाठी येऊ असे आम्ही ठरवले होते त्यानुसार आम्ही या ठिकाणी आलो ग्रामस्थ व यात्रा समितीच्या वतीने आम्हाला यासाठी सहकार्य मिळाले यामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी झाला. – नवनाथ नाईकनवरे मार्गदर्शक (योद्धा करिअर अकॅडमी)

