पदोन्नती नाकारल्याने मुख्याध्यापकांविरोधात कर्मचाऱ्याचे आमरण उपोषण

केम (संजय जाधव) : साडे (ता.करमाळा) येथील साडे हायस्कूल या माध्यमिक शाळेतील शिपाई पदावरून पदोन्नतीने कनिष्ठ लिपिक पदावर नियुक्ती केलेल्या आबासाहेब विश्वनाथ काळे यांची मुख्याध्यापकांकडून पुन्हा शिपाई पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे काळे यांनी मुख्याध्यापक यांच्या विरोधात दिनांक काल (दि.२१) पासून साडे येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.
याविषयी आंदोलनाविषयी अधिक माहिती देताना आबासाहेब काळे म्हणाले की, मला संस्थेने दिनांक ०१/०१/२०२४ पासून शिपाई पदावरून पदोन्नतीने कनिष्ठ लिपिक पदावर नियुक्ती दिलेली आहे. या नियुक्तीस शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर यांची वैयक्तिक मान्यता असून पदोन्नतीने मिळणाऱ्या कनिष्ठ लिपिक पदाची वेतन निश्चिती लेखा अधिकारी कार्यालया मार्फत झालेली आहे. पदोन्नतीच्या दिनांकापासून सदर कर्मचारी शाळेत कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहेत. ०१/०६/२०२४ पासून या शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापक पदाचा पदभार विकास माळवे यांनी घेतलेला आहे. त्यानंतर मुख्याध्यापक माळवे यांनी प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या परिपत्रकानुसार शाळेतील विद्यार्थ्यांची पटपडताळणी करून सेवक संच दुरुस्त करून घेतला नाही. त्यामुळे सेवक संचातील लिपिक वर्गीय पद कमी झाले. त्यानंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कार्यरत पदांची माहिती शासनाकडे कळवताना मला कनिष्ठ लिपिक पदाची मान्यता असताना शिपाई पदावर पदावनत करून माहिती पाठवली.
मान्यता प्राप्त लिपिकास मुख्याध्यापकाने स्वतःच्या अधिकारात शिपाई केले. या दोन्ही बाबींच्या तक्रारी मी संस्थेकडे व शिक्षण विभागातील वरिष्ठ कार्यालयांकडे केलेल्या आहेत. मुख्याध्यापकांनी पदाचा गैरवापर करून अन्याय केल्याबाबत तक्रार दिल्यानंतर शिक्षण विभागाने मुख्याध्यापकास नोटीस देखील काढली आहे. या सर्व प्रक्रियेनंतर मुख्याध्यापकाकडून कार्यवाही होत नसल्याने मी आमरण उपोषणाचा मार्ग निवडला असून लेखी निवेदन शिक्षण विभागास दिलेले आहे. शाळेच्या मुख्याध्यापकाकडून पदाचा गैरवापर करून शासनाकडे चुकीची माहिती देणे, विद्यार्थ्यांची पट पडताळणी न करता कार्यरत पदांवर विपरीत परिणाम होईल यासाठी प्रयत्न करणे या गंभीर बाबी घडलेल्या आहेत. असे काळे यांनी सांगितले.
आबासाहेब काळे यांनी केलेल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी शिक्षक भारती करमाळा या शासन मान्य संघटनेने या उपोषणास जाहीर पाठिंबा दिलेला असल्याचे संघटनेचे तालुकाध्यक्ष विजयकुमार गुंड यांनी सांगितले.





