जेऊर ग्रामपंचायत निवडणुकीत आचारसंहितेचा भंग – बालाजी गावडे यांची तक्रार..
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : जेऊर ग्रामपंचायतीच्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आचारसंहितेचा भंग होत असलेली लेखी तक्रार जेऊर येथील बालाजी गावडे यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की जेऊर येथे सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू असताना सरपंच पदाचे एक उमेदवार उघडपणे मतदारांना पैसे वाटप करत आहेत.
तसेच आचारसंहिता कालावधीत ग्रामपंचायतीकडून रस्त्यावर मुरूम टाकणे, गटारीचे चेंबर्स बांधणे अशी कामे होत असून प्रशासकी इमारतीचा वापर ग्रामपंचायतीची सत्ता असलेले लोक प्रचारासाठी वापरत आहेत. विरोधी पॅनलच्या उमेदवारांनी रितसर परवानगी घेऊन लावलेले बॅनर रातोरात काढून नेले जात आहेत. स्थानिक प्रशासन फक्त बघ्याची भुमिका घेत आहेत. यामुळे या प्रकरणी अधिकाऱ्याने तात्काळ लक्ष देऊन संबंधितावर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी श्री. गावडे यांनी केली आहे.