कोर्टी ते आवाटी रस्त्याचे काम पूर्ण करा अन्यथा जनआंदोलन : नारायण पाटील..
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : कोर्टी ते आवाटी रस्त्याचे काम पूर्ण करा अन्यथा जनआंदोलन केले जाईल; असा इशारा माजी आमदार नारायण पाटील यांनी दिला आहे. याबाबत तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने सुरू व्हावे म्हणून लक्ष देण्याची मागणी निवेदनाव्दारे पाटील यांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना पाटील म्हणाले, की करमाळा तालुक्यामधून जाणारा दौंड-राशिन- कोर्टीकरमाळा- आवाटी – बार्शी असा हा मार्ग असून या राज्यमार्ग ६८ मधील किमी १३७/०० ते १८९/०० म्हणजेच कोर्टी- आवाटी रस्त्याचे काम बंद आहे. प्रशासकीय मान्यता तसेच सुमारे १६९ कोटी रूपयांची तरतूद असतानाही केवळ ठेकेदाराच्या चालढकलपणा व निष्क्रीयतेमुळे या रस्त्यावरील दुरुस्तीचे काम बंद आहे.
ठेकदार हा रस्ता दुरुस्तीचे काम करण्यास नकारात्मक मानसिकता दाखवत असूनही संबंधित विभागाकडून या ठेकेदारास वारंवार मुदतवाढ दिली जात आहे. सदर ठेकेदाराने रस्त्याच्या दोन्ही बाजू अर्धवट उखडून ठेवल्यामुले दळणवळणास धोका निर्माण होऊन अपघातांची शक्यता जास्त प्रमाणात तयार झाली आहे. यावर छोटे-मोठे अपघातही होऊ लागले आहेत. काम अर्धवट अवस्थेत असल्याने धूळीचे साम्राज्य पसरले असून वाहनचालकांना जीवावर बेतून वाहने चालवावी लागत आहेत.
सध्या ऊस गाळपाचा हंगाम असून या मार्गावर ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ऊस वाहतूक करताना या मार्गावर वाहने रखडली जात असल्याने याचा परिणाम ऊसावरही होत असून रिकव्हरी आदीचा विचार केला तर भविष्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही होत असल्याचे दिसून येते. यामुळे शेतकरी, सर्वसामान्य नागरी व शालेय विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, बंद असलेले काम त्वरीत सुरू करावे.
प्रशासनाने यावर गंभीरतेने विचार करून पुढील कार्यवाही न केल्यास संबंधित ठेकेदार बदलून त्यास ब्लॅकलिस्ट मध्ये टाकले जावे अन्यथा जनआंदोलन उभारले जाईल, असाही इशारा माजी आमदार नारायण पाटील यांनी दिला आहे. या रस्त्याबाबत आपण लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले.