करमाळा येथील मारुती मंदिर परिसरात काँक्रीटीकरणास सुरुवात

करमाळा (दि. २७): श्री मारुती मंदिर परिसरातील रखडलेले काँक्रीटीकरणाचे काम अखेर सुरू झाले असून, यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत करमाळा नगरपरिषदेकडून या कामासाठी मंजुरी मिळाली होती. संबंधित ठेकेदाराला वर्क ऑर्डर देण्यात आली होती, मात्र त्याने मुदतीत कामास सुरुवात केली नव्हती.

ठेकेदाराला दिलेल्या सहा महिन्यांच्या कालावधीतही कोणतेही प्रत्यक्ष काम न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. ही बाब माजी नगरसेवक फारुक जमादार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गेल्या तीन-चार महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा केला. यासंदर्भात त्यांनी १७ मार्च २०२५ रोजी उपोषण करण्याचा इशारा पालिकेला लेखी स्वरूपात दिला होता.

त्यांच्या या ईशाऱ्यानंतर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व बांधकाम अभियंता यांनी लेखी पत्राद्वारे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले आणि आता प्रत्यक्षात या कामाला सुरुवात झाली आहे.
सदर प्रकरणातून स्थानिक जनप्रतिनिधींच्या सक्रियतेमुळे रखडलेली कामे मार्गी लागू शकतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.






