सदोष बियाण्यांचा फटका – निमकर कंपनीला ३ लाख ९५ हजार रूपये भरपाई देण्याचा आदेश-ग्राहक आयोगाचा निर्णय

करमाळा : अंजनडोह येथील शेतकऱ्यांना सदोष काळीतुर बियाण्याचा फटका बसल्याच्या प्रकरणात निमकर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ,फलटण यांच्यावर मोठी कारवाई करत सोलापूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने तब्बल ३ लाख ९५ हजार रुपयांची भरपाई ४५ दिवसांत देण्याचा सक्त आदेश दिला आहे. रक्कम दिली नाही तर दरवर्षी ६ टक्के व्याज आकारण्यात यावे, असेही स्पष्ट निर्देश या आदेशात देण्यात आले आहेत.

याप्रकरणाची सविस्तर माहिती अशी ,की सतीश कांतीलाल बलदोटा व संतोष कांतीलाल बलदोटा (रा. करमाळा) यांनी गोविंदास गोपालदास देवी फर्म, करमाळा येथून १६ जुलै २०२१ रोजी NRT-27 या वाणाचे काळीतुर बियाणे खरेदी केले होते. सुरुवातीला पीक चांगले उगवले, मात्र नर फुलधारणा मोठ्या प्रमाणावर झाल्याने उत्पादन ६०-७० टक्क्यांनी घटले, असा घातक फटक शेतकऱ्यांस बसला.

शेतकऱ्यांनी तातडीने तालुका व जिल्हा कृषी कार्यालयात तक्रारी दाखल केल्या, पंचनामे करून पुरावे गोळा केले, संबंधित अधिकाऱ्यांना जागी बोलावले. मात्र त्याकडे दुर्लक्षच झाल्याने बलदोटा कुटुंबाने शेवटी २७ फेब्रुवारी २०२३ रोजी ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली.
या तक्रारीवर सुनावणी करताना आयोगाच्या अध्यक्षा सौ. भारती सोळवंडे व सदस्या श्रद्धा बहिरट यांनी दिलेल्या निर्णयात म्हटले आहे की, “निमकर कंपनीने सदोष बियाणे पुरवले असून, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा झाला आहे.”

- त्या अनुषंगाने आयोगाने कंपनीवर खालीलप्रमाणे भरपाई लादली आहे –
- ३,००,००० रुपये – उत्पादन नुकसान भरपाई,
- ६०,००० रुपये पीकाचा खर्च,५,००० रुपये – अनुचित व्यापारी प्रथा दंड,
- २०,००० रुपये मानसिक त्रास नुकसान भरपाई,
- १०,००० रुपये – तक्रार नोंदणीचा खर्च असे
- एकूण – ₹३,९५,०००/- देण्याचा आदेश दिला आहे.
तक्रारीचा अंतिम आदेश २५ जून २०२५ रोजी झाला. आयोगाने स्पष्ट आदेश दिला आहे की, ४५ दिवसांत रक्कम भरली नाही, तर प्रत्येक वर्षी ६ टक्के दराने व्याजासहित ती वसूल करण्यात यावी.
या निर्णयावर प्रतिक्रिया देताना बलदोटा कुटुंबाने सांगितले की, “शेतकऱ्याला न्याय मिळवण्यासाठी किती खस्ता खाव्या लागतात, हे या प्रकरणातून स्पष्ट होते. शासनाने अशा कंपन्यांवर वेळेवर आणि ठोस कारवाई करावी.”
हा निर्णय इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारा असून सदोष बियाण्यांविरुद्ध न्याय मिळवण्यासाठी जिद्द, पुरावे आणि सातत्य आवश्यक आहे, हे यातून अधोरेखित झाले आहे.
