संस्कारक्षम पिढीसाठी शिक्षकांचे योगदान महत्वाचे : पोलिस निरीक्षक श्री.घुगे – एकलव्य आश्रमशाळेत गुणवंतांचा सन्मान..
करमाळा / संदेश प्रतिनिधी : चांगल्या समाज निर्मितीसाठी संस्कार महत्वाचे असतात. त्यासाठी शिक्षकांची जबाबदारी मोठी आहे. कारण शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानावर भविष्यातील पिढी वाटचाल करणार असते. संस्कारक्षम पिढीसाठी शिक्षकांचे योगदान महत्वाचे असते. असे मत करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी व्यक्त केले.
येथील एकलव्य आश्रमशाळेत पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेले प्रतीक भगत (करमाळा), पुणे ग्रामीण पोलीस दलात निवड झालेले सचिन रोडे (आळजापूर), पारधी समाजातील गुणवंत विद्यार्थी मंदेश काळे (तरटगाव) यांचा सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पो. नि. घुगे हे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आश्रमशाळेचे संस्थापक – अध्यक्ष रामकृष्ण माने हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार, ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष ॲड.डॉ.बाबुराव हिरडे, किशोर भगत, ज्येष्ठ पत्रकार निवृत्ती सुरवसे, उद्योजक नितीन दोशी, सुधाकर वांगडे, राजेंद्र काळे, हनुमंत नलवडे, फौजदार बिभीषण जाधव, युवा एकलव्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. संग्राम माने, वंदन काळे आदि उपस्थित होते.
पुढे बोलताना पो. नि. घुगे यांनी, गुन्हेगारमुक्त समाज होण्यासाठी संस्कारक्षम शिक्षणाची भुमिका महत्वाची असते. प्रगती साधताना संगतीवर खूप गोष्टी अवलंबून असतात. शासनाच्या योजनाचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला पाहिजे. तसेच सेवेत दाखल झालेल्यानी समाजाचे ऋण फेडण्यासाठी काम केले पाहिजे. असे स्पष्ट केले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना ॲड.हिरडे यांनी, गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप देण्यासाठी आयोजित केलेला हा कार्यक्रम निश्चित उल्लेखनीय आहे. ग्रामीण भागातील मुले स्पर्धा परीक्षेत यश मिळवीत आहेत. हे प्रेरणादायी आहे. अशा विद्यार्थ्यांच्या यशापासून इतर विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेतली पाहिजे. आश्रमशाळेच्या माध्यमातून माने यांनी उभारलेले कार्य मोठे असून या शाळेतून भविष्यातील प्रशासकीय अधिकारी निर्माण व्हावेत. असे त्यांनी म्हटले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माने यांनी, गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. याशिवाय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळविणे हे खूप अनमोल आहे. समाजातील उपेक्षित घटकांना शिक्षणामुळेच प्रगती साधता येते. त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष करु नका. असे स्पष्ट केले. यावेळी सुधाकर वांगडे, निवृत्ती सुरवसे यांनी तसेच भगत, रोडे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक किशोरकुमार शिंदे यांनी केले. तर आभार विठ्ठल जाधव यांनी मानले. यावेळी मुख्याध्यापक अशोककुमार सांगळे, शिक्षक भास्कर वाळुंजकर, विलास कलाल, कुमार पाटील, प्रल्हाद राऊत, विद्या पाटील, बाळासाहेब शिंदे, उमेश गायकवाड, सैदास काळे, वंदना भालशंकर, दिपाली माने तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
स्वप्न पूर्ण झाले : प्रतिक भगत आई, वडिलांचे पाठबळामुळे यश मिळाले आहे. तसे तर मी इंजिनिअरिंग केलेले आहे. पण पोलीस सेवेत जाण्याची इच्छा होती. याशिवाय पोलीस अधिकारी बनण्याचे माझ्या वडिलांचे स्वप्न होते. पण प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले नाही. माझ्यामुळे ते पूर्ण होत झाले आहे. त्याचा आनंद मोठा आहे. पदाचा उपयोग समाजाच्या हितासाठी करणार अशी ग्वाही देतो.