भिलारवाडी येथे जपानी तंत्रज्ञानाने ८८ प्रकारच्या देशी वृक्षाने मिनी फॉरेस्टची निर्मिती..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : भिलारवाडी (ता.करमाळा) येथे जपानी तंत्रज्ञानाने विकसीत केलेल्या ऑक्सिजन हबचा वसुंधरा अर्पण सोहळा करण्यात आला असून, आशिर्वाद ग्रोथ फाउंडेशन पुणे यांच्यावतीने एक गुंठे क्षेत्रावर विविध ८८ प्रकारच्या देशी वृक्षांची जपानी मियावाकी तंत्रज्ञानाचा उपयोग करून मिनी फॉरेस्टची निर्मिती करण्यात आली आहे.
एक वर्षांपूर्वी लागवड केलेल्या वृक्षांची जोमदारपणे वाढ झाली असून अशाच प्रकारचे दुसरें युनिटची निर्मिती करण्यात आली आहे. पुणे येथील उद्योजक उदयन साठे व अंजली साठे या दाम्पत्याच्या हस्ते या मिनी फॉरेस्ट चा लोकार्पण सोहळा संपन्न झाला, यावेळी बोलताना अंजली साठी म्हणाल्या की, आपण आयुष्यभर निसर्गाकडून अनेक गोष्टी घेत असतो सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण रक्षणासाठी आपणही काहीतरी केले पाहिजे यासंदर्भात आशीर्वाद ग्रुप फाउंडेशन चे कार्य कौतुकास्पद असून यापुढेही या प्रकारच्या कार्यासाठी आमचा सहभाग निश्चित असेल.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे मिनी फॉरेस्ट ही संकल्पना निसर्ग संवर्धनासाठी अत्यंत उपयुक्त असल्याने ज्यांना शक्य असेल अशांनी जाणीवपूर्वक यासाठी प्रयत्न केले पाहिजेत सुरुवातीला उपस्थित यांचे स्वागत व प्रास्ताविक आशीर्वाद ग्रुप फाउंडेशनचे सुनील चोरे यांनी केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजय कोष्टी मकरंद केतकर यांनी आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाला माजी सरपंच रामभाऊ येडे रामकृष्ण अंबोधरे, बँक ऑफ महाराष्ट्र चे व्यवस्थापक मनोज कुरकुरे, माजी विस्तार अधिकारी मुकुंद शिंगाडे,उद्योजक दत्तात्रय गोसावी,डॉ अमित मेरगळ कृष्णा सोरटे,आबा मेरगळ,बाबू वाल्हेकर ,माजी सरपंच भाऊसाहेब शिंगाडे,चांगदेव मेरगळ,लक्ष्मण मोहिते गजेंद्र पोळ, प्रशांत नाईकनवरे यांच्यासह परिसरातील निसर्गप्रेमी मंडळी उपस्थित होती.