करमाळा शहरालगत अहमदनगर महामार्गावर असलेल्या एम.आय.डी.सी.मधील प्लॉटचे सध्याचे दर कमी करावेत – दिग्विजय बागल
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा शहरालगत अहमदनगर महामार्गावर असलेल्या महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहत अर्थात एम.आय.डी.सी.मधील उद्योगांसाठी असलेल्या प्लॉटचे सध्याचे दर उद्योजकांना परवडणारे नाहीत, त्यामुळे जमिनीच्या प्लॉटचे दर शासनाने प्रतिचौरसमीटर १०० ते १५० रूपये एवढे ठेवावेत, म्हणजे उद्योजकांना दिलासा मिळेल असे आवाहन श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी केले आहे.
याबाबत अधिक बोलताना श्री बागल म्हणाले की, करमाळा शहरालगत मांगी रोडला लागुनच महाराष्ट्र औद्योगिक वसाहत लोकनेते स्व.दिगंबररावजी बागल मामा हे आमदार असतांनाच मंजूर करून घेतली होती. तालुक्यातील युवक उद्योजकांसाठी व करमाळा तालुक्यातील बेरोजगारांच्या हाताला या औद्योगिक वसाहतीमुळे एम आय डी सी मुळे काम मिळेल व तालुक्यातील जनतेला दिलासा मिळेल या भुमिकेतून या एम.आय.डी.सीची मंजुरी आणुन ४६ हेक्टर जमीन शासनाने त्याचवेळी एमआय डीसी करीता अधिग्रहित केली होती.
परंतु एखाद्या उद्योजकाला जर काही उद्योग अथवा कारखाने सुरू करायचे असतील तर एमआयडीसी मधील जमिनींचे प्लॉटचे दर सद्या ७०० रुपये प्रतिचौरसमीटर इतके आहेत.हे दर खुप जास्त असुन राज्यात कोणत्याही एमआयडीसी मध्ये एवढे प्लाँटचे दर नाहीत. ही बाब उद्योजकांवर अन्यायकारक आहेत. त्यामुळे करमाळा एमआयडीसी मध्ये उद्योग सुरू करण्यासाठी वा स्थापीत करण्यासाठी कंपन्या कारखानदार पुढे येत नाहीत. याशिवाय तेथे उद्योगांकरीता शाश्वत पाणीपुरवठ्याची सुविधा नाही. त्यामुळे इच्छा असुनही अनेक उद्योजक आकर्षित होत नाहीत.
करमाळा शहर व तालुक्याचा विकास थांबलेला आहे. वास्तविक पाहता शासनाने उद्योजकांसाठी केवळ १०० ते १५० रुपये प्रतिचौरसमीटर या दराने प्लाँटची विक्री करावी जेणेकरून अनेक छोट्या मोठ्या उद्योजकांना निश्चितपणे दिलासा मिळेल. याबाबत लवकरच मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व मा.उद्योगमंत्री यांना समक्ष भेटुन विनंती करणार असल्याचे श्री बागल यांनी म्हटले आहे.