शासकीय कार्यालयात २८ सप्टेंबर हा दिवस ‘माहिती अधिकार दिन’ म्हणून साजरा करावा : दादा राऊत यांची मागणी..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : शासकीय कार्यालयात २८ सप्टेंबर २०२३ हा दिवस ‘माहिती अधिकार दिन’ म्हणून साजरा करण्याबाबत माहिती अधिकार महासंघाच्यावतीने पोंधवडी (ता.करमाळा) येथील दादा परबत राऊत यांनी सर्व शासकीय अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले कि, माहिती अधिकार हा नागरिकांना हक्क प्रदान करणारा महत्त्वपूर्ण कायदा असून, या कायद्याचा प्रसार व प्रचार करणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी आहे. तसेच या कायद्याचे महत्त्व व उपयोगिता सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच सामान्य नागरिक यांना व्हावी म्हणून शासकीय आस्थापना म्हणून आपली जबाबदारी आहे.
आंतराराष्ट्रीय स्तरावर २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने २८ सप्टेंबर हा दिवस महाराष्ट्र शासन अधिनस्त प्रत्येक सरकारी कार्यालयात माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करावा असा शासन निर्णय क्रमांक-केमाअ २००८/ पत्र क्र. ३७८/०८/सहा सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई दिनांक : २० सप्टेंबर २००८ रोजी घेतला आहे.
सदर निर्णयानुसार दरवर्षी सर्व शासकीय कार्यालयात माहिती अधिकार दिन साजारा करण्याचे शासनाचे आदेश आहे. या निर्णयानुसार माहिती अधिकार या विषयावर विविध उपक्रम साजरे करून तसेच प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्धी देऊन नागरिकांना या माहिती अधिकार दिन उपक्रमात सहभागी करून घ्यावे व त्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थाची मदत घ्यावी असे शासनाने सूचविलेले आहे. त्याची आपल्या शासकीय कार्यालयात अंमजबजावणी व्हावी. या वर्षी २८ सप्टेंबर २०२३ या दिवशी अनंत चतुर्दशी तसेच ईद ए मिलाद या सणांची सूटटी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे २८ सप्टेंबर रोजी शक्य नसल्यास सदर माहिती अधिकार दिन हा २७ सप्टेंबर २०२३ किंवा २९ सप्टेंबर २०२३ या दिवशी साजरा करावा तसेच तशा सूचना आपल्या अधिनस्त सर्व शासकीय कार्यालयाला तातडीने कराव्यात, असेही या निवेदनात म्हटले आहे.