केम रेल्वे स्थानकावर दादर-पंढरपूर व मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेस गाड्यांचा थांबा झाला कायम
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – केम रेल्वे स्थानकावर दादर-पंढरपूर (गाडी क्रमांक 11027/11028) व मुंबई-हैदराबाद (गाडी नंबर 22731/22732) या दोन एक्सप्रेस गाड्यांना ७ जानेवारी २०२३ पासून थांबा मिळाला होता. हा थांबा रेल्वे विभागाने प्रायोगिक तत्त्वावर दिला होता. परंतु आता या गाड्यांना प्रवाशांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे रेल्वे विभागाने ९ जून रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे कायम स्वरूपी थांबा मंजूर केला आहे. यामुळे केम प्रवासी संघटना व केम परिसरातील नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.
केम स्टेशनवर याआधी थांबा असलेल्या एक्स्प्रेस कोरोना कालावधीत बंद करण्यात आल्या. यानंतर केम स्टेशनवर थांबा मिळावा म्हणून केम मधील केम प्रवासी संघटना,व्यापारी असोसिएशन, प्रहार संघटना व नागरिकांनी रेल्वे विभागाकडे प्रयत्न केले. याबरोबरच खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्याकडेही मागणी केली. खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. रेल्वे विभागाने तांत्रिक अडचण दाखवली तेव्हा त्यांनी रेल्वे बोर्ड सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. अखेर सर्व प्रयत्नानंतर ३० डिसेंबर २०२२ च्या रेल्वे विभागाने काढलेल्या परिपत्रकाद्वारे केम रेल्वे स्थानकावर दादर-पंढरपूर (गाडी क्रमांक 11027/11028) व मुंबई-हैदराबाद (गाडी नंबर 22731/22732) या दोन एक्सप्रेस गाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर थांबा दिला होता.
या गाड्यांना प्रवाशांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे रेल्वे
विभागाने ९ जून २०२३ रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे कायम स्वरूपी थांबा मंजूर केला आहे. यामुळे केम परिसरातील नागरिकांनी रेल्वे विभागाचे, खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांचे आभार मानले.