दहिगाव बंद नलिका वितरण – सत्ताधारी राष्ट्रवादीचे आंदोलन – ३० मे पासून काम सुरू होणार

करमाळा (दि.१६): दहिगाव उपसासिंचन योजनेचे बंद नलिका वितरण प्रणालीचे बंद पडलेले काम तात्काळ सुरू करण्याबाबत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १६ ला शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता अर्जुननगर फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी कुकडी डावा कालवा उपविभाग क्र.१२ चे उपविभागीय अधिकारी श्री. राजगुरू यांनी हे काम ३० मे पासून सुरू करण्यात येईल; असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भरत आवताडे यांच्यासह हनुमंत मांढरे, विलासकाका राऊत, चंद्रहास निमगिरे, विवेकराव येवले, शितल क्षीरसागर, नंदिनी लुंगारे, अशपाक जमादार, भाजपाचे गणेश चिवटे, मनसेचे नानासाहेब मोरे, कांतीलाल राऊत, आशिष गायकवाड, सोमनाथ रोकडे, अशोक माने, रविंद्र वळेकर, गणेश सरडे, शहाजी कोंडलकर, स्वप्निल पाटुळे, विलास बेडकुते, रणजित देवकर व माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे स्वीय सहाय्यक विकास वीर यांच्या उपस्थितीत हे आंदोलन संपन्न झाले. या आंदोलनात हनुमंत मांढरे, विलासकाका राऊत, भाजपाचे गणेश चिवटे, शितल क्षीरसागर, विकास वीर व ज्येष्ठ पत्रकार विवेकराव येवले यांची भाषणे झाली.


यावेळी विकासकामाला लोकप्रतिनिधीकडून अडथळा येत आहे; असा सूर आवळत अधिकाऱ्यांना कोणाचा दबाव आहे का ? ज्यांनी काम अडवले त्याच्यावर शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा का दाखल होत नाही ?, ज्यांनी पाईप जाळले त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक का केली जात नाही?.. अशा मागण्या करण्यात आल्या.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक रोहित शिंदे यांनी सदर गुन्ह्यातील आरोपींना शोधून लवकरात लवकर अटक करू; असे सांगितले. तर उपविभागीय अधिकारी श्री. राजगुरू यांनी लेखी पत्र देत हे बंद पडलेले काम ३० मे पासून सुरू करू; असे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

सर्व मलिद्याचा खेळ ?
यात विद्यमान लोकप्रतिनिधीच्या प्रतिनिधीने सदरचे काम माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी जनतेच्या हितासाठी न करता स्वत:च्या कमिशनसाठी मंजूर केले आहे; असे म्हटले आहे. तर माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रतिनिधीने हे काम एक वर्षभर सुरू होते. तेव्हा विरोध केला नाही, परंतु विद्यमान लोकप्रतिनिधींना काही अपेक्षा आहेत, त्या पूर्ण होत नाहीत म्हणून त्याला विरोध केला जात आहे. दोन्ही गटाकडून एकमेकांवर केलेले आरोप पाहता विकासकामा पेक्षा हा वाद मलिद्याचा आहे की काय ? अशी शंका निर्माण होते.


