दहिगाव योजना बंदनलिका वितरण प्रणाली कामाचा उद्या 5 डिसेंबर ला भूमिपूजन समारंभ – आमदार संजयमामा शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप उपस्थित राहणार..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या बंदनलिका वितरण प्रणाली कामाचे भूमिपूजन उद्या 5 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता होणार असल्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी सांगितले आहे.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, दहिगाव उपसा सिंचन योजना ही 1996 साली मंजूर झालेली योजना होती. या योजनेची चारी आणि उपचारी यांची कामे अपूर्ण असल्यामुळे लाभक्षेत्रातील जवळपास 5 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यापासून वंचित होते. या वंचित असलेल्या क्षेत्राला दहिगाव योजनेच्या पाण्याचा लाभ मिळावा यासाठी आपण दहिगाव उपसा सिंचन योजनेची दुसरी सुधारित प्रशासकीय मान्यता घेतली.
त्यानंतर 2020 पासून 2023 पर्यंतच्या अर्थसंकल्पामध्ये जवळपास 109 कोटी निधीची तरतूद दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी केल्यामुळे दहिगाव योजनेच्या 27 वितरिका, 99 उपवितरीका व 19 थेट विमचक यांची अपूर्ण असलेली कामे केली जाणार आहेत.
या सर्वच कामांचे 101.34 कोटी कामांची निविदा आपण काढली असून सदर काम द इंडियन ह्युम पाईप कं लिमिटेड मुंबई या कंपनीला मिळाले आहे. योजनेची अपूर्ण कामे पूर्ण झाल्यानंतर 10 हजार 804 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे .त्याचबरोबर दहिगाव योजनेला मंजूर असलेल्या 1.81टीएमसी पैकी 0.46 टीएमसी पाण्याची बचती होणार आहे त्याचा फायदा योजनेच्या लाभक्षेत्रातील इतर गावांना पाणी देण्यासाठी होणार आहे.
सदर योजनेच्या या कामाचे भूमिपूजन उद्या 5 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता होणार असून या कार्यक्रमासाठी योजनेच्या लाभ क्षेत्रातील जेऊरवाडी, कुंभेज, खडकेवाडी, गुळसडी ,देवळाली, पांडे ,अर्जुननगर ,हिसरे, शेलगाव कडेवळी, फिसरे, सरपडोह, सौंदे, सालसे, आळसुंदे, साडे, वरकटणे , कोंढेज ,जेऊर, शेलगाव वांगी, लव्हे,निंभोरे, घोटी ,वरकुटे, भाळवणी या गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार संजयमामा शिंदे संपर्क कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.