उजनीत १० टीएमसी पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी धरणग्रस्तांचे भिगवण येथे रास्ता रोको आंदोलन
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – उजनी धरणावरील इतर धरणातून दहा टीएमसी पाणी उजनी मध्ये सोडावे .. तसेच उजनीतून खालील खालील भागात कॅनॉल द्वारे सोडण्यात येणारे पाणी बंद करावे तात्काळ बंद करावे या मागणीसाठी करमाळा इंदापूर कर्जत दौंड या भागातील धरणग्रस्त शेतकऱ्यांनी गुरुवारी (दि.१) सोलापूर पुणे महामार्गावर भिगवण येथे रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे महामार्गावर सुमारे तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
सदर मागणीचे निवेदन उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना याआधी दिले होते परंतु प्रशासनाने यावर कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे सदर आंदोलन करण्यात आले.
२००३ साली देखील उजनी धरण असेच मायनस मध्ये गेले असताना तत्कालीन मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी कॅबिनेटचा विरोध झुगारून उजनी धरणावरील धरणांमधून दहा टीएमसी पाणी उजनी मध्ये सोडण्यात यश मिळवले होते. तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री दिगंबरराव बागल यांचा देखील सहभाग महत्त्वाचा होता हेच उदाहरण घेऊन यावर्षी देखील उजनी धरणामध्ये 10 टीएमसी पाणी सोडण्यात यावे अशी मागणी उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष शिवाजीराव बंडगर यांनी आपल्या भाषणात केली.
प्रा.रामदास झोळ यांनी आपल्या भाषणात सांगितले की, जायकवाडी पॅटर्नप्रमाणे उजनी धरणात पुणे जिल्ह्यातील 19 धरणातुन 10 टि एमसी पाणी सोडण्याच्या बाबत संबंधीताची लवकरात लवकर बैठक घेऊन आमच्या मागणीचा सकारात्मक विचार व्हावा, अन्यथा सिंचन भवन पुणे येथे आंदोलन करणार असुन यातुन न्याय न मिळाल्यास कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नाही. याबरोबरच उजनी धरण पाणी वाटप नियोजनानुसार झाले पाहिजे.या करीता कालवा समितीमधील राजकीय हस्तक्षेप बंद करण्यासाठी कालवा समिती तात्काळ बरखास्त करण्यात यावी अशीही मागणी प्रा.रामदास झोळ यांनी त्यांच्या भाषणात व्यक्त केले.
यावेळी उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष शिवाजीराव बंडगर, महारुद्र पाटील, धनंजय डोंगरे, सुभाष गुळवे,सवितादेवी राजेभोसले, गणेश झोळ, अजित झांजूरने, अजित रणदिवे, रंगनाथ शिंदे, प्रा. रामदास झोळ, , पाटील,सुहास गलांडे, किरण कवडे, डॉ.गोरख गुळवे, सचिन पिसाळ, देविदास साळुंखे,निलेश देवकर, कुलदीप पाटील, नंदकुमार भोसले आदीजन उपस्थित होते.
दरम्यान या संदर्भात उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा.शिवाजीराव बंडगर यांनी दि.३१ रोजी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची मुंबईत समक्ष भेट घेऊन विविध मागण्यांसाठी निवेदन दिले आहे. यामध्ये उजनीच्या वरील बाजूस असलेल्या पुणे जिल्ह्य़ातील धरणातून १० टीएमसी पाणी उजनी जलाशयात सोडावे, उजनीच्या खाली भागात कॅनॉलमधून सोडण्यात येणारे पाण्याचे आवर्तन बंद करावे, सोलापूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या समांतर जलवाहिनीचे काम तात्काळ पूर्ण करावे, कालवा सल्लागार समितीत तालुक्यातील मूळ धरणग्रस्तांचे प्रतिनिधी घ्यावेत आदी मागण्या केल्या आहेत. पुढील आठवडय़ात सोलापूरात उजनीच्या पाण्यासंदर्भात शासकीय अधिकारी व संघर्ष समिती यांची बैठक लावून आढावा घेऊ व धरणग्रस्तांच्या मागणीचा विचार करू असे आश्वासन देखील पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.