दौंड-कलबुर्गी रेल्वे सेवा ३ महिन्यांसाठी कायम-खासदार मोहिते पाटील यांच्या प्रयत्नांना यश

केम(संजय जाधव): दौंड–कलबुर्गी रेल्वे सेवा ही ७ जुलैपासून बंद होणार होती. मात्र, माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून या सेवेला ३ महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. ही माहिती मोहिते गटाचे युवा नेते अजितदादा तळेकर यांनी दिली.

पुणे येथे मध्य रेल्वेचे महाप्रबंधक यांच्यासोबत झालेल्या बैठकीत खासदार मोहिते पाटील यांनी या रेल्वे सेवेची गरज लक्षात घेऊन ती नियमित सुरू ठेवण्याची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे प्रशासनाने २८ सप्टेंबर २०२५ पर्यंत सेवा सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले.

या रेल्वे सेवेचा उपयोग पारेवाडी, जेऊर, केम, कुर्डुवाडी, माढा, मोहोळ या भागातील प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर होतो. यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही सेवा थांबविण्याच्या निर्णयामुळे नागरिकांमध्ये नाराजी होती.

खासदार मोहिते पाटील यांच्याकडे ही मागणी युवा नेते अजितदादा तळेकर यांनी लावून धरली होती. याच मागणीस सोलापूर जिल्हा प्रवासी संघटनेचाही पाठिंबा मिळाला होता. अखेर सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांना यश आले.

या रेल्वेगाडीमुळे गाणगापूर, अक्कलकोट या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांना जाणाऱ्या भाविकांचीही सोय झाली आहे. त्यामुळे सदर रेल्वे सेवा ही दररोज सुरू ठेवण्याची गरज अधिक तीव्र झाली आहे. यासाठी खासदार मोहिते पाटील प्रयत्नशील आहेत, असेही अजितदादा तळेकर यांनी सांगितले.




