उजनी जलाशयात बुडालेल्या 6 जणांचे मृतदेह सापडले – कुगाव व झरे गावावर शोककळा..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.22) : कुगाव (ता.करमाळा) ते कळाशी (ता.इंदापूर, जि.पुणे) या दरम्यान झालेल्या वादळी वाऱ्यामुळे 21 मे रोजी सायंकाळी प्रवासी बोट उलटली व त्यामध्ये असलेले सात प्रवासी पाण्यात बेपत्ता झाले होते, त्यातील एकजण पोहत पाण्याबाहेर आल्याने बचावला होता, परंतु सहाजणांचा गेल्या 2 दिवसापासून शोध सुरु होता, सायंकाळी तपास थांबवून पुन्हा आज (ता.23) सकाळी शोधमोहीम युद्धपातळीवर सुरु होती, सुरुवातीला पाच जणांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले तर एकाचा शोध सुरुच होता, त्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर सहाव्या व्यक्तीचा शोध लागला अखेर 2 दिवसाच्या शोधानंतर 6 जणांचे मृतदेह मिळाले आहेत.
या सर्वांचे मृतदेह करमाळा येथील उपजिल्हारुग्णालयात पोस्टमार्टेम करण्यासाठी आणले होते, व त्यानंतर पुढे अंत्यसंस्कार करण्यासाठी नेण्यात आले आहेत. या मृतांमध्ये कुगाव येथील अनुराग ज्ञानदेव अवघडे (वय 28), गौरव धनंजय डोंगरे (वय 24) तसेच झरे येथील गोकुळ जाधव (वय 30), कोमल गोकुळ जाधव (वय 25), माही गोकुळ जाधव (वय 3) व शुभम गोकुळ जाधव (दिड वर्ष) यांचा समावेश आहे. सध्या या सर्वांवर अंत्यविधीची प्रक्रिया सुरु असून, करमाळा तालुक्यासह झरे व कुगाव या दोन गावांवर अक्षर:श शोककळा पसरली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून 6 जणांचा शोध सुरु होता, यासाठी एनडीआरएफचे पथक व खासगी बोटीच्या साह्याने त्यांचा शोध घेत होते, बेपत्ता झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांचा परिसरात दिवसभर आक्रोश सुरु होता.
करमाळा हद्दीतील कुगावसह परिसरातील नागरिकांकडून शोध घेतला जात होता तर कळाशीच्या हद्दीत शोध मोहीम सुरु होती, यासाठी एक पाणबुडी, तीन बोटी व २० जवान हे शोध घेत होते, त्यांच्या मदतीला परिसरातील मच्छिमारांच्या व प्रवासी बोटी मदत करत होत्या. तसेच शेकडो नागरिक मदत कार्य करत होते.
या उजनीच्या परिसरात शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. आजही सकाळी मृतदेह पाहण्यासाठी नागरिकांनी तुफान गर्दी केलेली पाहायला मिळाली, करमाळा पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.