शेतकऱ्यांना कर्ज माफी, रेशन कार्ड सातबारा दुरुस्तीतील समस्या सोडवाव्यात
केम (संजय जाधव) – शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळावी, नागरिकांना रेशन कार्ड, सातबारा दुरुस्ती करताना अनेक अडचणी आहेत त्या सोडवाव्यात या मागणीसाठी बहुजन संघर्ष सेनेच्या वतीने येत्या सोमवारी २९ जुलै रोजी करमाळा तहसील कार्यालया समोर निदर्शने करणार असून तसे निवेदन तहसील कार्यालयास दिले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी माध्यमांना दिली.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी मुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे अशा परिस्थिती मध्ये बँकांचे कर्ज फेडणे शेतकऱ्याला मुश्किल झाले आहे शेतकऱ्यांना बँकांच्या कर्जातून मुक्त करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी या प्रमुख मागणीसाठी तहसील कार्यालय करमाळाच्या समोर बहुजन संघर्ष सेना निदर्शने करणार आहे. त्याच प्रमाणे तहसील कार्यालयातील पुरवठा विभागामध्ये एक महिन्यापासून सर्व्हर डाऊन आहे असे सांगून रेशन कार्डमध्ये नावे समाविष्ट अथवा नावे कमी करणे, नवीन रेशन कार्ड काढणे ही सर्व कामे ठप्प आहेत. तसेच सातबारा दुरुस्ती व सातबारा संदर्भातील अर्ज एक एक दोन दोन वर्षापासून तहसील कचेरी मध्ये पडून आहेत. या सर्व समस्या सोडवाव्यात यासाठी बहुजन संघर्ष सेना तहसील कार्यालय करमाळाच्या समोर येत्या सोमवारी दिनांक २९ जुलै रोजी वेळ ११ वाजता निदर्शने करणार आहे यावेळी सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी केले आहे.