मोहरम सणापूर्वी नालसाहेब सवारी परिसर स्वच्छ करण्याची मागणी

करमाळा (दि.११) – येत्या ६ जुलै २०२५ रोजी होणाऱ्या मोहरम (ताजिया) सणाच्या पार्श्वभूमीवर करमाळा शहरातील हिंदू-मुस्लिम धर्मातील मानाच्या नालसाहेब सवारीच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरलेली आहे. पावसाचे साचलेले पाणी, गटारीतील सांडपाणी आणि चिखल यामुळे सवारीच्या पावित्र्याला बाधा पोहोचत असून, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सवारीसमोरील जागेचा वापर अनेकजण लघुशंकेसाठी करत असल्याने, परिसराचे पावित्र्य भंग पावत आहे. त्यामुळे सणापूर्वी परिसराची संपूर्ण स्वच्छता करून भाविकांची गैरसोय टाळावी, अशी मागणी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाऊंडेशन करमाळा आणि सकल मुस्लिम समाज, करमाळा यांच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीसंदर्भात करमाळा नगरपालिकेला निवेदन सादर करण्यात आले असून, यावेळी अलीम खान (नालसाहेब सवारीचे सेवेकरी), जमीर सय्यद, रमजान बेग, सुरज शेख, इकबाल शेख, मुस्तकीम पठाण, इम्तियाज पठाण, जहाँगीर बेग, जावेद सय्यद, अरबाज बेग, शाहीद बेग, कलीम शेख आदी उपस्थित होते.




