दौंड-कलबुर्गी शटल रेल्वेसेवा पूर्ववत करण्याची रेल्वे महाव्यवस्थापकांकडे मागणी
केम(संजय जाधव) – दिवाळी सणासाठी प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेली दौंड-कलबुर्गी शटल ही रेल्वेसेवा पूर्ववत करावी अशा प्रकारची मागणी जिल्हा प्रवासी संघ आणि केम ग्रामस्थांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमकुमार मीना यांच्याकडे निवेदन देऊन केली. ही रेल्वे गाडी भिगवण, पारेवाडी, जेऊर, केम, कुर्डुवाडी या स्टेशनवर थांबा असल्याने करमाळा तालुक्यातील सर्वांना सोयीची होती.
काल (दि. १३) जेऊर रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यासाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक (जनरल मॅनेजर) धरमकुमार मीना आले होते. याप्रसंगी जिल्हा प्रवासी संघ अध्यक्ष संजय पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार केमचे ग्रामस्थ यांचे वतीने दौंड – कलबुर्गी ही रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठीची मागणी करण्यात आली. दीपावली सणानिमित्त दौंड ते कलबुर्गी या दोन स्टेशन दरम्यान दोन विविध रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. यातील गाडी क्र. 01421/01422 ही गाडी आठवड्यातून सोमवार ते शुक्रवार अशी पाच दिवस तर गाडी क्र. 01425/01426 ही गाडी आठवड्यातून गुरुवार आणि रविवार अशी दोन दिवस चालली. या गाडीला भिगवण, पारेवाडी, जेऊर, केम, कुर्डुवाडी या स्टेशनवर थांबा असल्याने करमाळा तालुका व परिसरातील लोकांना या गाडीचा फायदा होत होता. परंतु ही रेल्वे गाडी फक्त दिवाळी पुरतीच मर्यादित होती.
या रेल्वेसेवेचा लाभ विद्यार्थी, मासिक पासधारक, शेतकरी, शेतमजूर, रुग्ण त्यांचे नातेवाईक, शासकीय कामानिमित्त जिल्हा मुख्यालय सोलापूर कडे जाणारे नागरिक, रेल्वे कर्मचारी, धार्मिक स्थळांना भेट देणारे भाविक या सर्वांसाठी होत होता. ऑफिस वेळेमध्ये सोलापूरला पोहोचवेल अशी ही रेल्वे सेवा तेव्हा सुरू करण्यात आली होती. तिला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद लाभला होता. नंतरच्या काळात ही सेवा स्थगित करण्यात आली.त्यामुळे आजमितीला सोलापूरला जाण्यासाठी सकाळी कोणतीही रेल्वे सेवा नाही.
यामुळे विद्यार्थी, मासिक पासधारक यांची गैरसोय होत आहे. तरी सदरची रेल्वे सेवा पूर्ववत करण्याची विनंती आज निवेदनाद्वारे करण्यात आली.निवेदन देताना श्री.सुहास सूर्यवंशी,केमचे प्रा. प्रशांत सावंत,पत्रकार संजय जाधव सर,पत्रकार हर्षवर्धन गाडे आदीजन उपस्थित होते.
संबंधित बातमी – दिवाळीनिमित्त दौंड-कलबुर्गी विशेष अनारक्षित ट्रेन – पारेवाडी, जेऊर, केम स्टेशन वर थांबा