सुरक्षेच्या दृष्टीने करमाळा शहरात सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याची मागणी
करमाळा (दि.१९) – करमाळा शहरात होणाऱ्या गाड्यांची चोरी, घरफोडी, महिलांची छेडछाड या सारख्या गुन्ह्यांवर आळा बसण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने करमाळा शहरात ज्या ज्या ठिकाणी गरज आहे अशा ठिकाणी सीसीटीवी कॅमेरा बसविण्यात यावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
करमाळा तालुक्यातील व आसपासच्या विविध गावातील लोक बाजारहाट, दवाखाने बँका आदी महत्त्वाच्या कामासाठी करमाळ्यात येत असतात त्यामुळे शहरात रोज व बाजार दिवशी तर फार मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अनेकांच्या गाड्या, वस्तू चोरीला जातात. त्यामुळे महत्वाची ठिकाणे भाजी मंडई, विविध शाळा-कॉलेज रोड, मुख्य बाजारपेठ, बँका, दवाखाने अशा गरजेच्या ठिकाणी सीसीटीवी कॅमेरा बसविण्यात यावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
करमाळा शहरात या आधी हाजी हाशमोद्दिन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करमाळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परीसरात व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परीसरात सीसीटीवी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानच्या वतीने करमाळा बस स्थानक परिसरात सीसीटीवी कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत.
करमाळा शहरातील गणेशोत्सव मंडळानी आपल्या खर्चातून 10 टक्के खर्च बाजूला काढला तरी आपापल्या भागातील परिसर हा सीसीटीवी कॅमेरा युक्त होईल. यासाठी सर्वच मंडळांनी पुढाकार घेऊन काम केले पाहिजे. डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम फाउंडेशन या संस्थेने शहरातील राम मंदीर येथे व मोहल्ला गल्ली परीसरात सीसीटीवी कॅमेरा बसविले आहे. तसेच वेताळ पेठ येथील जामा मस्जिद व मोहल्ला गल्लीतील माॅं आयशा मस्जिद येथे सुद्धा कॅमेरे बसविण्यात आले आहेत, या संस्थांचा आदर्श घेऊन करमाळा शहरातील प्रत्येक गणेशोत्सव मंडळांने आपला परिसर हा सीसीटीवी कॅमेरा च्या छायेत आणण्यासाठी पुढाकार घेतलाच पाहिजे.
करमाळा शहरात जर विविध ठिकाणी सीसीटीव्ही बसविले गाड्या चोरी, दरोडे, महिला, शालेय विद्यार्थिनींची छेडछाड या घटनांना आळा बसेल व जर काही घटना झालीच तरं पोलिस तपास योग्य व लवकर होऊन गुन्हेगारांवर आळा बसेल. करमाळा शहरात आधुनिक सी.सी.टिव्ही कॅमेरे लावण्यासाठी सर्वांनी शासनाकडे व आमदारांकडे पाठपुरावा करावा. मी देखील पत्राद्वारे आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे या संदर्भात मागणी करणार आहे.