करमाळा शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा शहरातील अनेक प्रमुख रस्त्यावरील चौकांमध्ये मोकाट जनावरांचा वावर वाढत चालला असून त्याचा त्रास येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना होत आहे. त्यामुळे करमाळा नगर पालिकेने याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष हनुमंत- मांढरे पाटील यांनी केली आहे.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, प्रामुख्याने करमाळा बस स्थानक व गायकवाड चौकात जास्त प्रमाणात मोकाट जनावरे वाहतुकीस अडथळा करून भर रस्त्यात उभारलेली व बसलेली असतात त्याचा त्रास वाहनधारकासह खेड्यापाड्यातून तसे शहरातून येणाऱ्या शाळकरी मुला मुलींना होताना दिसत आहे गायकवाड चौक हा शहरातील प्रमुख रहदारीचा व वर्दळीचा चौक आहे या चौकातून पुणे- मुंबई सह इतर लहान – मोठ्या शहराकडे खेड्यांकडे जाण्याचा मार्ग आहे त्यामुळे या चौकात शहरातील इतर चौका पेक्षा वाहतूक जास्त प्रमाणात असते त्याच प्रमाणे या चौकाच्या जवळच महात्मा गांधी हायस्कूल यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व इतर शाळा हायस्कूल असल्याने विद्यार्थी व वाहनधारकांची वर्दळ जास्त असते अशातच या चौकात मोकाट जनावरे व बेशिस्तपणे केलेली वाहनांची पार्किंग या मुळेे नागरिकांना विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
करमाळा बस स्थानकात रात्रीच्या वेळी मोकाट जनावरे वास्तव्य करत असल्याने रात्रभर त्यांनी केलेल्या घाणीमुळे प्रवासी,विद्यार्थी व इतर लोकांना त्या घाणीच्या साम्राज्याला व दुर्गंधीला सामोरे जावं लागत आहे. सध्या करमाळा शहरांमध्ये घाणीचे साम्राज्य झालेले असून करमाळा नगरपालिका कारभार राम भरोसे चालू आहे. लवकरात लवकर शहरातील रस्त्यावरील मोकाट जनावरे व बेशिस्त पार्किंगचा प्रश्न करमाळा नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी समन्वय साधून मार्ग काढावा अन्यथा 15 ऑगस्ट रोजी शहरातील मोकाट जनावरे पकडून करमाळा नगरपालिका मुख्याधिकारी यांच्या खुर्चीला बांधू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष हनुमंत- मांढरे पाटील यांनी दिला आहे.