विद्यार्थ्यांना ‘स्टिंग’सारख्या उत्तेजक पेयांपासून दूर ठेवण्याची मागणी

केम (संजय जाधव):: शालेय विद्यार्थ्यांमध्ये ‘स्टिंग’सारख्या उत्तेजक पेयांची वाढती लोकप्रियता पाहता, अशा पेयांपासून त्यांना दूर ठेवावे, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या करमाळा शाखेने केली आहे. यासाठी शिष्टमंडळाने गटशिक्षणाधिकारी, जिल्हाधिकारी तसेच शालेय शिक्षण मंत्री यांना निवेदन दिले आहे.

गटशिक्षणाधिकारी कार्यालयात श्री. टकले यांनी हे निवेदन स्वीकारले. यावेळी जिल्हा महिला आघाडी प्रमुख माधुरी परदेशी, करमाळा तालुका अध्यक्ष ब्रह्मदेव नलावडे, तालुका संघटक अजिम खान, कार्यकारिणी सदस्य संजय हंडे, भीमराव कांबळे, मंजिरी जोशी, अनिल माने आदी उपस्थित होते.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, काही शालेय विद्यार्थी ‘स्टिंग’ व तत्सम ऊर्जा पेये नियमितपणे सेवन करीत आहेत. यामुळे त्यांच्यावर शारीरिक व मानसिक दुष्परिणाम होत असून, त्यांच्या आरोग्याशी ही बाब थेट संबंधित आहे. समाजाच्या जबाबदार घटक म्हणून सर्वांनीच या मुलांना अशा पेयांपासून दूर ठेवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर, सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना सुचना देण्यात याव्यात की, विद्यार्थ्यांनी अशी पेये विकत घेऊ नयेत किंवा शाळा परिसरात सेवन करू नयेत याबाबत सतर्कता बाळगावी. शाळा पातळीवर प्रबोधन करून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी, अशी मागणीही यामध्ये करण्यात आली आहे.





