प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी केम रेल्वे स्थानकावर हुतात्मा एक्स्प्रेसला तात्पुरता थांबा देण्याची मागणी

केम (संजय जाधव): लोणावळा–कर्जत दरम्यान झालेल्या जोरदार पावसामुळे भूस्खलन झाल्याने रेल्वे मार्गावरील दुरुस्तीची कामे सुरू आहेत. त्यामुळे १० जुलै ते १७ जुलै या कालावधीत काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये केम रेल्वे स्थानकावर थांबणाऱ्या हैदराबाद–मुंबई एक्स्प्रेस आणि दादर–सातारा एक्स्प्रेस या गाड्यांचाही समावेश आहे. परिणामी, सकाळी पुणे व मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
ही गैरसोय लक्षात घेऊन केम ग्रामपंचायतीने ठरावाद्वारे हुतात्मा एक्स्प्रेसला केम रेल्वे स्थानकावर तात्पुरता थांबा देण्यात यावा, अशी मागणी सोलापूर विभागाच्या रेल्वे प्रबंधकांकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, केमहून पुणे व मुंबईकडे जाण्यासाठी सकाळी सुमारे ६ वाजता सुटणारी हैदराबाद–मुंबई एक्स्प्रेस ही प्रवाशांसाठी अत्यंत सोयीची गाडी होती. केम व परिसरातील व्यापारी, कुंकू उद्योगाशी संबंधित व्यावसायिक तसेच नोकरदार या गाडीने सकाळी पुणे किंवा मुंबई येथे जाऊन दिवसभराची कामे करून सायंकाळी परत येत असत. तसेच अनेक प्रवासी या गाडीने पुण्याला नियमित अप-डाउन करतात.
सध्या केमहून सकाळच्या वेळेत पुण्याकडे जाणारी एकही रेल्वे उपलब्ध नसून, त्याचबरोबर पुरेशी एसटी बससेवाही नसल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या अडचणी लक्षात घेऊन हुतात्मा एक्स्प्रेसला केम रेल्वे स्थानकावर तात्पुरता थांबा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भातील निवेदन केम रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्टर शेंडे यांच्याकडे देण्यात आले. त्यांनी हे निवेदन रेल्वे विभागाकडे तातडीने पाठवून थांबा मिळविण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.
यावेळी माजी सरपंच आकाश भोसले, सरपंच प्रतिनिधी राहुल कोरे, तिकीट बुकिंग प्रतिनिधी अर्जुन अवघडे, प्रवासी संघटनेचे राहुल रामदासी, बापू केंगार तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.



