अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत व सरसकट कर्जमाफीची मागणी

कंदर(संदीप कांबळे)– करमाळा व माढा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी, शेतमजूर यांचे प्रचंड नुकसान झाले असून तातडीने मदत मिळावी, अशा मागण्या रयत क्रांती शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. यासाठी उपविभागीय अधिकारी माढा तसेच तहसील कार्यालय करमाळा यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद केले आहे की, चारही बाजूंनी झालेल्या मुसळधार पावसामुळे ऊस, केळी, द्राक्ष, मका, टॉमेटो, डाळिंब, कांदा आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत, घरे कोसळून शेतकरी उघड्यावर आले आहेत. शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे स्वप्न चुरगळले असून त्यांना तातडीची मदत मिळणे आवश्यक आहे.

आधीच कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून हमीभाव मिळत नाही. मुख्यमंत्री व सरकारने दिलेली आश्वासने हवेतच राहिली असून बळीराजा संकटात आहे. त्यामुळे करमाळा व माढा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुके ओला दुष्काळग्रस्त घोषित करावेत, घरांचे, जनावरांचे व पिकांचे सरसकट पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई द्यावी, सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी संघटनांनी केली.

निवेदन उपविभागीय अधिकारी माढा मुंडे व नायब तहसीलदार विजयकुमार जाधव यांना देण्यात आले. या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख अमोल शेठ जगदाळे, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख राजकुमार सरडे, प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील, प्रहार करमाळा तालुकाध्यक्ष संदीप तळेकर, रयत क्रांती करमाळा तालुका अध्यक्ष शिवशंकर जगदाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व शेतमजूर उपस्थित होते.




 
                       
                      