कुंभेज फाटा येथे मराठा समाजाचे आंदोलन -आरक्षण, शैक्षणिक सवलती आणि खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी

करमाळा (प्रतिनिधी) – मराठा समाजासाठी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊन जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या तात्काळ मान्य करण्यात याव्यात या मागणीसाठी करमाळा तालुक्यातील कुंभेज फाटा येथे आज (दि. १२) मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

आंदोलनादरम्यान, सगेसोयरे संबंधी नियमांची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी, पडताळणी कार्यालयातील एजंटांचा सुळसुळाट थांबवून त्यांच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. तसेच, कुणबी नोंद सापडलेल्या मराठा बांधवांना सुलभ पद्धतीने तात्काळ दाखले देणे, मराठा विद्यार्थी-विद्यार्थिनींना शैक्षणिक सवलती व वसतिगृह भत्ता मिळवून देण्यासाठी सर्व विद्यापीठांना आदेश देणे, मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत आणि लोकसंख्येच्या प्रमाणात घटनात्मक कक्षेत बसणारे आरक्षण देणे, आंदोलकांवरील खोटे गुन्हे मागे घेणे आणि ‘सारथी’ तसेच ‘आण्णासाहेब पाटील महामंडळा’ची कार्यक्षमता वाढविण्याच्या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

आंदोलनास सोलापूर येथील समन्वयक टीमने मार्गदर्शन केले. यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक राजन जाधव, माऊली पवार, रवी मोहीते, अॅड. श्रीरंग लाळे, महेश पवार आदी उपस्थित होते.
“सनदशीर मार्गाने दीर्घकाळ चाललेला हा लढा मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळाल्यावरच थांबेल. तोपर्यंत करमाळा तालुक्यातील समाजबांधव मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. वरून जो आदेश येईल तो मानून आंदोलन सुरू राहील,” – सचिन काळे, मराठा सेवा संघ करमाळा तालुकाध्यक्ष.



