वक्फ मालमत्तांचा व्यापारी गाळे, शैक्षणिक संकुल व रुग्णालयांसाठी वापर करावा – करमाळा मुस्लिम समाजाकडून मागणी

करमाळा : करमाळा शहरात सकल मुस्लीम समाजाच्या वतीने मस्जिद, मदरसा तसेच वक्फच्या इतर मालमत्तांशी संबंधित अडचणी सोडविण्यासाठी भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास महाराष्ट्र वक्फ बोर्डचे अध्यक्ष समीर काझी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या वेळी महाराष्ट्र राज्य काझी सेवा संघचे अध्यक्ष शफीक भाई काझी, जमियत उलमा-ए-हिंदचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष हाफीज सिद्दीकी, सुलेमानिया मस्जिदचे मौलाना फारुख रझा, आयशा मस्जिदचे मुफ्ती अबू रेहान, मौलाना सय्यद अली, सकल मुस्लीम समाजाचे शहराध्यक्ष जमीर सय्यद, मौलाना रफीक यांची उपस्थिती होती.

मेळाव्यात बोलताना सकल मुस्लीम समाज करमाळाचे मार्गदर्शक हाजी कलीम काझी यांनी विविध मागण्या मांडल्या. वक्फ बोर्डाच्या जागांवर बेरोजगार युवकांसाठी उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी गाळ्यांची उभारणी करावी, अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी तीन ते चार तालुके मिळून शैक्षणिक संकुल स्थापन करावे, तसेच मुस्लीम आणि हिंदू समाजातील गरीब कुटुंबांसाठी वक्फच्या जागेवर दर्जेदार आरोग्यसेवा देणारे रुग्णालय उभारावे, अशी मागणी करण्यात आली.

याशिवाय मुस्लीम समाजातील बेरोजगार युवक आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मौलाना आझाद आर्थिक महामंडळच्या माध्यमातून शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमात बोलताना समीर काझी यांनी वक्फ बोर्डाच्या मालमत्तांचा व्यावसायिक पद्धतीने विकास करून बोर्डाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यावर भर देण्यात येईल, तसेच समाजातील उपेक्षित घटकांच्या उन्नतीसाठी ठोस पावले उचलली जातील, असे आश्वासन दिले.


